पहिल्यांदा घटस्फोट; एकटेपणामुळे पुनर्विवाह, सेकंड इनिंग सुरु...
By नम्रता फडणीस | Published: August 7, 2024 06:23 PM2024-08-07T18:23:54+5:302024-08-07T18:25:44+5:30
वय अणि परिस्थितीचा विचार करून दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला अन् पुनर्विवाह करून नव्याने सेकंड इनिंग सुरु केली
पुणे: खरंतर दोघांचा प्रेमविवाह. पण, दोघांचा संसार सहा वर्षच चालला. त्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. परंतु दोघे वेगळे तर झाले पण दोघांनाही एकटेपणा जाणवू लागला. वय अणि परिस्थितीचा विचार करून दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. दोघांनी पुनर्विवाह करून नव्याने सेकंड इनिंग सुरु केली.
राकेश (४०) आणि स्मिता (वय ३८) (नाव बदलले आहे) अशी दोघांची नावे आहेत. दोघांतर्फे ॲड. प्रणयकुमार लंजिले, ॲड. अनिकेत डांगे आणि ॲड. लक्ष्मण सावंत यांनी काम पाहिले. हे जोडपे मूळचे परराज्यातील आहे. दोघांना चांगली नौकरी आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर दोघांमध्ये प्रेम झाले. यातून दोघांनी २०१६ मध्ये विवाह केला. काही दिवस संसार सुरळीत सुरू होता. मात्र, राकेशला मद्याचे व्यसन होते. यातून तो तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. तिचे सोन्याचे दागिने विकले. दोघातील वाद विकोपाला गेले. तिने कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दावाही दाखल केला. नंतर २०२२ मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. दोघांना अपत्य नव्हते. त्यानंतर वर्षभर ते वेगळे राहिले. मात्र, काही कारणाने पुन्हा संपर्कात आले. बोलू लागले. यातून दोघांना एकटेपणा जाणवत असल्याचे लक्षात आले. त्यांनी वकिलांशी संपर्क साधला. घटस्फोटानंतर पुन्हा विवाह करता येत असल्याचा सल्ला ॲड. प्रणयकुमार लंजिले यांनी दिला. या सल्ल्याने दोघांनी पुन्हा एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. जुलै महिन्यात त्यांनी पुन्हा लग्न केले. दोघांनी नव्याने इनिंग सुरू केली आहे. यामुळे दोघांना जीवनभराचा आधार मिळणार आहे.