आजपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:12 AM2021-05-20T04:12:46+5:302021-05-20T04:12:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना देण्याच्या नियमामुळे लाभार्थी संख्या मर्यादित राहिल्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना देण्याच्या नियमामुळे लाभार्थी संख्या मर्यादित राहिल्याचा ‘शोध’ बुधवारी प्रशासनाला लागला. त्यामुळे गुरुवार (दि.२०) पासून पुन्हा ४५ वर्षांवरील नागरिकांचे पहिल्या डोससाठीचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. याकरीता ४८ केंद्रांची निवड करण्यात आली असून या प्रत्येक केंद्रांवर प्रत्येकी १०० डोस पाठविले जाणार आहेत.
यामध्ये उपलब्ध लसींच्या एकूण साठ्यांपैकी ६० टक्के लस या ऑनलाईन अपॉइंटमेंट/स्लॉट बुक केलेल्या नागरिकांनाच त्याही ४५ वर्षांवरील वयोगटासाठी पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे. याकरताचे ऑनलाइन बुकिंग सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे.
याचबरोबर २० टक्के लस ही ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस ऑफलाइन (केंद्रांवर नोंदणी) पद्धतीने नोंदणी करून देण्यात येणार आहे. तर २० टक्के लस या पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी (२४ फेब्रुवारीपूर्वी) घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोससाठी उपलब्ध राहणार आहेत.
चौकट
कोव्हॅक्सिन लसही मिळणार
२२ एप्रिलपूर्वी ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना गुरुवारी दुसरा डोस देण्यात येणार आहे. महापालिकेकडे मंगळवारी रात्री उशिरा अडीच हजार कोव्हॅक्सिन डोस प्राप्त झाल्याने त्या दिल्या जाणार आहेत. शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रत्येक ठिकाणी एका केंद्रावर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार असून प्रत्येक ठिकाणी लसीचे दीडशे डोस पाठविण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी केवळ लसीचा दुसरा डोस दिला जाणार असून पहिला डोस मिळणार नसल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले.