कोरोनामुक्तीनंतरचे पहिले ध्येय प्लाझ्मादान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:11 AM2021-05-08T04:11:55+5:302021-05-08T04:11:55+5:30
राहूल महाजन : दुखणे अंगावर काढू नका लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मागील वर्षी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सामाजिक कामात ...
राहूल महाजन : दुखणे अंगावर काढू नका
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मागील वर्षी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सामाजिक कामात आपल्याला खारीचा वाटा उचलता यावा, या दृष्टीने मी थोडे काम करायला सुरुवात केली. पोलिसांना मदत करणे, मजुरांना घरी पाठवण्यासाठी प्रयत्न करणे अशी विविध कामे सर्व काळजी घेऊन सुरू होती. त्या काळात हा विषाणू कधी ना कधी आपल्यालाही गाठणार, अशी मनाची तयारी झाली होती. पण सुदैवाने, पहिल्या लॉकडाऊनमध्ये तब्येत उत्तम राहिली. शेवटी यंदा कोरोनाने गाठलेच, असा अनुभव ३६ वर्षीय राहुल महाजन यांनी ‘लोकमत’ला सांगितला.
राहुल यांना सलग दोन-तीन दिवस थोडा ताप आणि अशक्तपणा जाणवत होता. स्थानिक डॉक्टरांना दाखवल्यावर व्हायरल इन्फेक्शन असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तिसऱ्या दिवशी अशक्तपणा खूपच वाढला. त्याच दिवशी डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटिजन टेस्ट करून घेतली, ती पॉझिटिव्ह आली. दुसऱ्या दिवशीपासून अन्नावरची वासनाही उडाली होती. कोरोना झाल्यावर काय काळजी घ्यायची, हे एव्हाना माहीत झाले होते. तरीही प्रत्यक्ष कोरोना झाल्यावर त्यांना थोडी भीती वाटली.
घरी नऊ जणांचे कुटुंब असल्याने इतरांना लागण होऊ नये म्हणून लक्षणे जाणवायला लागल्यापासूनच राहुल यांनी स्वतःला आयसोलेट केले आणि औषधोपचारांना सुरुवात केली. पाचव्या दिवशी मात्र श्वास घ्यायला त्रास होत होता, खूप दम लागत होता. त्या वेळी डॉक्टरांशी बोलल्यावर त्यांनी अॅडमिट होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पुढील सहा दिवस रेमडिसिविर इंजेक्शनचा कोर्स आणि इतर औषधे सुरू होती.
राहुल म्हणाले,“दवाखान्यात माझ्या खोलीत एक ६५ ते ७० वर्षांचे आजोबा आणि ५५ वर्षाचे काका होते. काकांना लंग फायब्रोसिसचा त्रास होता. त्यामुळे ते खूप घाबरले होते. दुसरीकडे आजोबा मात्र अत्यंत पॉझिटिव होते. त्यांना कोणाचीही मदत नको होती. शक्य ती सर्व कामे ते आपणहून स्वतः करत होते. आजोबांची सकारात्मकता पाहून मलाही प्रेरणा मिळाली. दिवसभर भजन म्हणणे, गाणी ऐकणे, चांगल्या गप्पा मारणे असे करत आम्ही तिघांनीही एकमेकांना साथ दिली. रुग्णांनी एकमेकांना साथ दिली तर दवाखान्यातील दिवसही पटकन निघून जातात आणि तब्येत सुधारायलाही मदत होते. सहा दिवसांनी इंजेक्शनचा कोर्स पूर्ण झाल्यावर मला डिस्चार्ज देण्यात आला. आजोबा आणि काकांनाही एक-दोन दिवसांच्या फरकाने डिस्चार्ज मिळाला. संकटाला घाबरून जाण्यापेक्षा परिस्थिती स्वीकारून पुढे जाण्यातच आपले हित असते.”
“कोरोनाकाळात कोणतीही लक्षणे दिसली तरी त्याकडे दुर्लक्ष करु नये आणि कोणतेही दुखणे अंगावर काढू नये. कारण माझ्या नात्यातील, ओळखीतील अनेकांनी केवळ दुखणे अंगावर काढले म्हणून त्यांना प्राण गमावले आहेत. त्यातून धडा घ्यायला हवा आणि वेळीच सजग व्हायला हवे, म्हणजे ऐन वेळची धावपळ टाळता येते.”
“कोरोनामुक्त झाल्यावर मनात आलेली पहिली भावना म्हणजे आता मी प्लाझ्मादान करू शकणार होतो. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात सामाजिक काम करत असताना मी अनेकांना प्लाझ्मादानासाठी अनेक लोकांना प्रवृत्त करत होतो. पोलिसांनी मला अडीचशे लोकांची यादी दिली होती. त्या सर्वांशी मी फोनवर संवाद साधत होतो. त्यापैकी केवळ पंधरा जण प्लाझ्मादानासाठी तयार झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कोरोनाबाबत लोकांमधील सजगता वाढली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे. कोरोनामुक्त झाल्यानंतर मी दोनदा प्लाझ्मादान केले. मला कोणताही त्रास झाला नाही.”