चित्रपटातला पहिला गुरू ‘समर’
By admin | Published: May 9, 2016 01:04 AM2016-05-09T01:04:30+5:302016-05-09T01:04:30+5:30
नाटकाचा माझा पिंड. ‘सामना’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी चालून आली आणि पाय काहीसे लटपटले... चित्र तर समोर दिसत होते; पण कॅमेऱ्याचे तंत्र अवगत नव्हते.
पुणे : नाटकाचा माझा पिंड. ‘सामना’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी चालून आली आणि पाय काहीसे लटपटले... चित्र तर समोर दिसत होते; पण कॅमेऱ्याचे तंत्र अवगत नव्हते... पण दहा दिवसांत त्याने मला चित्रपट कसा करायचा हे शिकविले... आणि दिग्दर्शनातील पहिल्याच चित्रपटाची बर्लिन महोत्सवात निवड झाली... चित्रपटातला माझा पहिला गुरू कुणी असेल तर समर नखाते’...हे बोल आहेत त्यांचे शिष्य प्रख्यात दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांचे.
आशय फिल्म क्लबच्या वतीने यंदापासून देण्यात येणारा ‘पी. के. नायर स्मृती सन्मान’ ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक समर नखाते यांना डॉ. पटेल यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डॉ. पटेल यांनी नखाते यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. या वेळी आशयचे सचिव सतीश जकातदार व वीरेंद्र चित्राव याप्रसंगी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना चित्रपटाचा बायोस्कोप अशी ख्याती असलेल्या समर नखाते यांनी चित्रपटाचे अवकाश उलगडले. नायर यांनी माझ्या जगण्याची दालने समृद्ध केली. आज तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जे समोर येत आहे ते जिवंत आहे की मृत, हेच कळणे कठीण झाले आहे. त्याच्याशी आपण एकरूप झालो आहोत का? हेच आता पुढच्या पिढीने जाणून घेण्याची गरज आहे. चित्रपट ही लोकशाही कला आहे. कुंपणे आपण निर्माण केली आहेत. त्यामध्ये खरे तर मोकळेपणा हवा. नाहीतर गोंधळ उडेल. वेगवेगळे कप्पे नको आहेत. जीवन प्रवाही राहायला हवे आणि कलाही. चित्रपटाने माणसाला सजग केले आहे. तेच करूयात आणि चांगला चित्रपट काढूयात... असे आश्वासक चित्र त्यांनी नवीन पिढीसमोर निर्माण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया चित्राव यांनी केले. (प्रतिनिधी)