आधी धुके आता वाहतूककोंडीचे कारण!; पुणे-कर्जत पॅसेंजर पुन्हा रद्द केल्याने प्रवासी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 11:31 AM2018-01-04T11:31:43+5:302018-01-04T11:44:36+5:30
पुणे-कर्जत पॅसेंजर आज (दि. ४) पुन्हा रद्द करण्यात आली आहे. यासाठी मध्य रेल्वेतर्फे मुंबईमधील वाहतूककोंडीचे कारण पुढे करण्यात आले आहे. रेल्वेच्या या भूमिकेवरून प्रवाशांमध्ये मात्र संतापाचे वातावरण आहे.
पुणे : पुणे-कर्जत पॅसेन्जर आज (दि. ४) पुन्हा रद्द करण्यात आली आहे. यासाठी मध्य रेल्वेतर्फे मुंबईमधील वाहतूककोंडीचे कारण पुढे करण्यात आले आहे. रेल्वेच्या या भूमिकेवरून प्रवाशांमध्ये मात्र संतापाचे वातावरण आहे.
मुळात पुणे-कर्जत पॅसेंजर ही कर्जतपर्यंतच असल्याने त्याचा मुंबईतील वाहतूककोंडीशी संबंधच काय? असा सवाल प्रवाशांनी केला आहे. विशेष म्हणजे इतर गाड्या मात्र सुरळीत सुरू असल्याबद्दल प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
दुपारी दीड वाजता धुके?
कर्जतला दुपारी दीड वाजता पोहोचणारी पुणे कर्जत पॅसेजर मध्य रेल्वेने दाट धुके पडत असल्याने १२ ते १४ डिसेंबर दरम्यान रद्द करण्यात आली होती. मुंबईत दुपारी दीड वाजताही दाट धुके असते का अशा प्रश्न प्रवाशांना पडला होता.
पुणे-कर्जत -पुणे (५१३१७/५१३१८) ही गाडी पुण्याहून सकाळी १११५ वाजता निघते व कर्जतला दुपारी दीड वाजता पोहचते. तेथून ती ३ वाजता निघून पुण्यात सायंकाळी साडेपाच वाजता पोहचते. या पॅसेंजरच्या तिकीटाचा दर कमी असल्याने असंख्य गरीब नागरिक या गाडीने जाणे पसंत करतात. मात्र वारंवार आणि न पटणारी कारणे रेल्वेकडून देण्यात येतात आणि ऐनवेळेला गाडी रद्द करण्यात येते त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.