भारतातील पहिलीच घटना; पुण्यात एक किडनी असलेल्या ३ वर्षाच्या श्वानावर यशस्वी शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 03:39 PM2021-09-03T15:39:48+5:302021-09-03T17:04:28+5:30
गुंतागुंतीची लेप्रोस्कोपिक हर्निया शस्त्रक्रिया, डॉक्टरांचे यशस्वी उपचार
पुणे : रॉली या ३ वर्षांच्या श्वानाला गेल्या एक वर्षापासून हर्नियाचा त्रास होता. गेल्या ३ महिन्यांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. जन्मत: एकच किडनी असलेल्या रॉलीला अलीकडेच हर्नियाचे निदान झाले. डॉक्टरांच्या सल्ल्याने जन्मत:च एक किडनी असलेल्या रॉलीवर दुर्मीळ लेप्रोस्कोपिक हर्निक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. अशा पध्दतीच्या शस्त्रक्रियेची ही भारतातील पहिलीच घटना आहे.
रॉलीला उलटी होणे, अतिसार, पाठीत कळ येणे, ओटीपोटात दुखणे, श्वास घेण्यात अडचण येणे आणि सतत लाळ गळणे अशी लक्षणे दिसून येत होती. त्याला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात आणण्यात आले. गॅस्ट्रोस्कोपी, सीटी स्कॅन आणि एमआरआय चाचण्या केल्यानंतर रोगाचे निदान झाले. हार्मोनिक स्केलपेल, लेप्रोस्कोपिक सेट आणि लिव्हर रीट्रॅक्टर यासारख्या विविध प्रकारच्या साधनांच्या मदतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर रॉली लवकरच बरा झाला. शस्त्रक्रियेनंतर रॉली १५ दिवस द्रव आहाराचे सेवन करत असल्याची माहिती डॉ. नरेंद्र परदेशी यांनी दिली. डॉ. परदेशी यांच्या नेतृत्वाखालील स्मॉल अॅनिमल क्लिनिक येथील डॉ. शशांक शाह यांनी शस्त्रक्रिया केली. त्यांच्यासोबत डॉ. ज्योती परदेशी, सुधींद्र हरीभत, रीना हरिभत, ऋतुजा काकडे, शिल्पा पुजारी यांची टीम कार्यरत होती.
शस्त्रक्रियेनंतर रॉलीमध्ये चांगले बदल झाल्याचे आमच्या लक्षात आले. तो आता मुक्तपणे फिरू शकतो. या शस्त्रक्रियेने आम्हाला पाळीव प्राण्याचे देखील चांगले पालक नक्कीच होता येते, याची जाणीव करून दिली. प्राण्यांनासुद्धा मनुष्यांसारखाच आजार किंवा वेदना होतात, परंतु आपल्यासारखे ते व्यक्त करू शकत नाहीत. म्हणूनच, जवळच्या पशुवैद्यांना भेट देऊन नियमित तपासणी करणे आणि त्यांना अशा आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी त्यांची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे, असे रॉलीचे पालक दिनेश कथुरिया यांनी स्पष्ट केले.