आधी भारताला प्राधान्य, मग जगाचा विचार : आदर पूनावाला यांचे ट्वीट : इतर देशांनी संयम बाळगण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:14 AM2021-02-23T04:14:56+5:302021-02-23T04:14:56+5:30
देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. त्यानंतर २० फेब्रुवारीपर्यंत भारतात १ कोटी १० लाख ८५ हजार १७३ ...
देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. त्यानंतर २० फेब्रुवारीपर्यंत भारतात १ कोटी १० लाख ८५ हजार १७३ लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. १५ मार्चपर्यंत आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे शासनाचे नियोजन आहे. देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मार्च महिन्यात सुरु होणार असल्याचे केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी जाहीर केले. लसीकरणाची गती वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लसींचे प्रमाणही वाढवावे लागणार आहे. त्यामुळेच भारताला लसींसाठी प्राधान्य देणार असल्याचे पूनावाला यांनी जाहीर केले.
‘सर्व देश आणि तेथील सरकारे कोव्हिशिल्ड लसीच्या पुरवठ्याची प्रतीक्षा करत आहेत. त्या सर्वांना मी संयम बाळगण्याची विनंती करतो. भारताची लसींची मोठी मागणी पूर्ण करण्यास सिरम इन्स्टिट्यूटकडून प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर योग्य समतोल साधून उर्वरित जगाची मागणी पूर्ण केली जाईल. सर्वांना लस मिळावी, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत’, असा संदेश आदर पूनावाला यांनी ट्वीटमधून दिला आहे.