मंदा-१ पर्वतशिखरावर उत्तर धारेने पहिली भारतीय मोहीम यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:11 AM2021-09-22T04:11:59+5:302021-09-22T04:11:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘माउंट मंदा-१’ या ६ हजार ५१० मीटर उंच व चढाईसाठी तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक शिखरावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘माउंट मंदा-१’ या ६ हजार ५१० मीटर उंच व चढाईसाठी तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक शिखरावर यशस्वी चढाई करत गिरीप्रेमींच्या शिलेदारांनी भारतीय गिर्यारोहण इतिहासात नवा अध्याय रचला. धोकादायक अशा उत्तर धारेने चढाई करत गिरीप्रेमी डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे व पवन हडोळे यांनी शिखरमाथा गाठला.
मिन्ग्मा शेर्पा व निम दोर्जे शेर्पा यांनी गिरीप्रेमीच्या गिर्यारोहकांना साथ दिली. माउंट मंदा-१ शिखराच्या उत्तर धारेने यशस्वी झालेली ही पहिली भारतीय गिर्यारोहण मोहीम असल्याचा दावा ‘गिरीप्रेमी’ने केला. एव्हरेस्ट शिखरवीर आनंद माळी यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी केले.
हिमालयातील केदारगंगा व्हॅलीत माउंट मंदा हा तीन शिखरांचा समूह आहे. यापैकी माउंट मंदा-१ या शिखराची उंची ६ हजार ५१० मीटर असून, चढाईसाठी हे शिखर अत्यंत आव्हानात्मक मानले जाते. या शिखराने बहुतांश वेळा गिर्यारोहकांना हुलकावणी दिली आहे. गिरीप्रेमींच्या गिर्यारोहकांनी १९८९ व १९९१ असे दोन वेळा माउंट मंदा-१ या शिखरावर मोहीम आयोजित केली होती; मात्र दोन्ही वेळा संघाला शिखर चढाईत अपयश आले होते; मात्र तब्बल ३२ वर्षांनी गिरिप्रेमींच्या नव्या दमाच्या गिर्यारोहकांनी गिर्यारोहणातील कौशल्ये पणाला लावून १८ सप्टेंबरच्या सकाळी संघाने शिखर चढाई यशस्वी केली.
माउंट मंदा-१ या मोहिमेसोबतच केदारगंगा व्हॅलीत असणारे ६०४१ मीटर उंच असलेले माउंट भृगु पर्वत या शिखरावर गिरिप्रेमीच्या दुसऱ्या संघाने यशस्वी चढाई केली. या मोहिमेत आनंद माळी, वरुण भागवत, ऋतुराज आगवणे, अंकित सोहोनी व रोहन देसाई यांनी सहभाग घेत शिखर चढाई यशस्वी केली. माउंट मंदा-१ व भृगु पर्वत या दोन्ही मोहिमांचे यशस्वी आयोजन करण्यामध्ये व्हाईट मॅजिक या संस्थेने मोलाचे सहकार्य केले.
कोट
“माउंट मंदा-१ हे सर्वार्थाने आव्हानात्मक शिखर असून, गिर्यारोहकांची अतिव परीक्षा पाहणारे आहे. येथे चढाईसाठी गिर्यारोहक मानसिक व शारीरिकदृष्ट्या अतिशय कणखर असावा लागतो. अशा आव्हानात्मक शिखरावर गिरीप्रेमींनी यश मिळविले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये माउंट मंदा-१ या शिखरावर भारतीय तिरंगा फडकविण्याचे भाग्य गिरीप्रेमी संस्थेला लाभले.”
- उमेश झिरपे, ज्येष्ठ गिर्यारोहक
फोटो ओळ : माउंट मंदा-१ या चढाईसाठी तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक शिखरावर यशस्वी चढाई करणारे गिरीप्रेमीचे डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे व पवन हडोळे आणि संघातील इतर सदस्य.