पहिल्या डावात २२ यार्ड्स संघाच्या ३५० धावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:11 AM2021-03-24T04:11:20+5:302021-03-24T04:11:20+5:30
पुणे : व्हिजन क्रिकेट अकादमी यांच्या वतीने व संतोष मते परिवाराच्या सहकार्याने आयोजित पहिल्या व्हिजन करंडक तीन दिवसीय ...
पुणे : व्हिजन क्रिकेट अकादमी यांच्या वतीने व संतोष मते परिवाराच्या सहकार्याने आयोजित पहिल्या व्हिजन करंडक तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या डावात श्रेयस केळकर (१४५धावा) याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर २२ यार्डस क्रिकेट अकादमी संघाने पहिल्या डावात श्री सिद्धीविनायक क्रिकेट क्लब संघापुढे ३५० धावांचे आव्हान ठेवले.
व्हिजन स्पोटर््स सेंटर, सिंहगड रोड येथील मैदानावर सुरू असलेल्या तीन दिवसीय लढतीत मंगळवारी पहिल्या दिवशी श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना २२ यार्डस क्रिकेट अकादमी संघाने ६१.२ षटकांत सर्वबाद ३५० धावा केल्या. यात श्रेयस केळकरने अफलातून फलंदाजी करताना १५२ चेंडूत २३ चौकारांच्या मदतीने १४५ धावा चोपल्या.
श्रेयसला नितीश सालेकरने ४२ धावा काढून सुरेख साथ दिली. या दोघांनी चौथ्या गडयासाठी ९३ चेंडूत ८९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्वप्नील वाळंज ३६, अमन मुल्ला २७, रोहित करंजकर २५, रणजीत मगर २५ यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. सिद्धिविनायक क्रिकेट क्लबकडून नीरज मोरे ३-७१, ऋतुराज वीरकर(२-१३), शंतनू गायकवाड(२-४४) यांनी २२ यार्डस संघाला रोखले.
श्री सिद्धीविनायक क्रिकेट क्लब संघाने दिवसअखेर १२ षटकांत एकही गडी न गमावता ४९ धावा केल्या. यात क्षितिज कबीर नाबाद ३३ धावा, श्लोक धर्माधिकारी नाबाद ९ धावांवर खेळत आहे. दोन्ही संघांचा अजून दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे.
संक्षिप्त धावफलक:
पहिला दिवस: पहिला डाव : २२ यार्डस क्रिकेट अकादमी : ६१.२ षटकांत सर्वबाद ३५० धावा (श्रेयस केळकर १४५ (१५२), नितीश सालेकर ४२ (५०), स्वप्नील वाळंज ३६ (४२), अमन मुल्ला २७, रोहित करंजकर २५, रणजीत मगर २५, आर्शीन देशमुख १८, नीरज मोरे ३-७१, ऋतुराज वीरकर २-१३, शंतनू गायकवाड २-४४) वि. श्री सिद्धीविनायक क्रिकेट क्लब : १२ षटकांत बिनबाद 49. (क्षितिज कबीर नाबाद ३३ (४३), श्लोक धर्माधिकारी नाबाद ९).