‘त्यां’ची वेदना उमटणार त्यांच्याच साहित्यामधून, पुण्यात होणार राज्यातील पहिले ‘एलजीबीटीआय’ साहित्य संमेलन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 01:26 AM2018-07-13T01:26:31+5:302018-07-13T01:26:59+5:30

मराठी सारस्वतांच्या महामेळ्यामध्ये आजही समाजातील अनेक दुर्लक्षित घटक साहित्यिक अंगाने उपेक्षितच राहिलेले आहेत. त्यांच्या जगण्याच्या आणि अस्तित्वाच्या आसपासही अनेकांची लेखणी पोहोचू शकलेली नाही. अशा उपेक्षित आणि दुर्लक्षित असलेल्या तृतीयपंथी, गे-लेस्बियन (समलिंगी), उभयलिंगी आदी समाजघटकांची तर कथाच निराळी.

The first 'LGBTI' Sahitya Sammelan will be organized in Pune by their own literature. | ‘त्यां’ची वेदना उमटणार त्यांच्याच साहित्यामधून, पुण्यात होणार राज्यातील पहिले ‘एलजीबीटीआय’ साहित्य संमेलन

‘त्यां’ची वेदना उमटणार त्यांच्याच साहित्यामधून, पुण्यात होणार राज्यातील पहिले ‘एलजीबीटीआय’ साहित्य संमेलन

Next

- लक्ष्मण मोरे
पुणे - मराठी सारस्वतांच्या महामेळ्यामध्ये आजही समाजातील अनेक दुर्लक्षित घटक साहित्यिक अंगाने उपेक्षितच राहिलेले आहेत. त्यांच्या जगण्याच्या आणि अस्तित्वाच्या आसपासही अनेकांची लेखणी पोहोचू शकलेली नाही. अशा उपेक्षित आणि दुर्लक्षित असलेल्या तृतीयपंथी, गे-लेस्बियन (समलिंगी), उभयलिंगी आदी समाजघटकांची तर कथाच निराळी. मात्र, आता त्यांचा आवाज समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी कोणा सिद्धहस्त लेखकाची आवश्यकताच राहिलेली नाही. कारण, स्वत:च्या व्यथा ते आता त्यांच्याच साहित्यातूनच मांडणार आहेत. येत्या नोव्हेंबरमध्ये पुण्यात पहिले राज्यस्तरीय ‘एलजीबीटीआय’ साहित्य संमेलन होणार आहे. परंपरागत पांढरपेशी साहित्याच्या ढाचाची चौकट मोडून नवा लढा या संमेलनाच्या माध्यमातून उभा राहू पाहत आहे.
साहित्य सर्वसमावेश असायला हवे हे जरी खरे असले, तरी प्रत्यक्षात मात्र तसे काही अपवाद सोडले तर फारच क्वचित घडते. प्रचलित समाजाची मानसिकताच एक प्रकारे साहित्यामधून उमटत असते. आजवर मुख्य प्रवाहातील साहित्यामधून आलेल्या भेदाच्या जाणिवेमधूनच दलित साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन अशी संमेलने भरू लागली. त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. स्त्रीवादी, वास्तववादी, उपेक्षितांचे प्रतिबिंब अलीकडच्या साहित्यात अभावानेच पाहायला मिळते. लेस्बियन-गे (समलिंगी), तृतीयपंथी, बायसेक्शुअल (उभयलिंगी), इंटरसेक्स या घटकांना त्यांचे विचार, वेदना, आशा-आकांक्षा आणि जगणे समाजापर्यंत पोहोचविताच येत नाही.
समाजात वर्षानुवर्षे असलेली त्यांची प्रतिमा तशीच एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे समज-गैरसमजांच्या रूपाने सरकवली जाते. कोणाचं जगणं मांडायचं झाल्यास त्याला आधार मिळत नाही. त्यामुळे एलजीबीटीआय समूहाच्या (कम्युनिटी) सदस्यांनीच तयार केलेल्या साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या या समूहातील अनेक जण विविध ब्लॉगच्या माध्यमातून लिहीत आहेत. अनेक जण कविता करतात, त्याचे सादरीकरणही करतात. अनेक जणांची पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. काही प्रकाशकांनी हे धाडस दाखविले आहे. मात्र, हे साहित्य हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतच आहे. या संमेलनात एलजीबीटीआय समूहासोबतच स्त्रीवादी चळवळीतील संघटना, उदारमतवादी पुरुष संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चासत्र होणार आहेत. हे संमेलन सर्व नागरिकांसाठी खुले राहणार आहे. ज्यांना या समूहाच्या वेदना, भुमिका, विचार जाणून घ्यायचे आहेत अशांचे स्वागत असल्याचे खिरे म्हणाले. या समूहाच्या साहित्याची ओळख मुख्य प्रवाहाशी करून देणे, हा मुख्य उद्देश या संमेलनामागे आहे.

या संमेलनाला कवयित्री दिशा शेख, नाटककार जमीर कांबळे, प्रमोद काळे आदी उपस्थित राहणार आहेत. प्रकाशकांसोबत एक चर्चासत्र घेण्यात येणार असून, काही पुस्तकांचे वाचन करण्यात येईल. सोशल मीडिया, यू ट्यूब, विकीपीडिया, फेसबुक, ब्लॉग आदी आॅनलाईन पद्धतींचा साहित्यप्रसार आणि लिखाणासाठी कसा उपयोग करून घेता येईल, याविषयी सुरेश खोले आणि पुष्कर एकबोटे मार्गदर्शन करणार आहेत.

विविध भाषांमधून मराठीमध्ये भाषांतरित झालेली पुस्तकेही संमेलनात असतील. कवितावाचनासोबतच अनुभवकथनावर विशेष भर या संमेलनात देण्यात येईल. महत्त्वाच्या नाटकांमधील ठराविक तुकडे सादर केले जातील.

एलजीबीटीआय समूहातील सदस्यांना त्यांचे अनुभव, जगणे मांडण्यासाठी प्रोत्साहित करण्याचाही उद्देश या साहित्य संमेलनाच्या मागे आहे. अनेकांना लिहिता-वाचता येत नाही; मात्र उत्तम प्रकारे व्यक्त होता येते.

त्यांच्या भावनांना शब्दरूप देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. पुण्यात हे साहित्य संमेलन होणार असून तयारीला सुरुवात करण्यात आल्याची माहिती समपथिक ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष बिंदुमाधव खिरे यांनी दिली.

त्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे. दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झालेले लेख, या समूहाविषयी असलेली नाटके, कविता, पुस्तके या संमेलनामध्ये ठेवण्यात येणार आहेत.

Web Title: The first 'LGBTI' Sahitya Sammelan will be organized in Pune by their own literature.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे