पहिले मराठी विद्यापीठ बदलापूरला

By admin | Published: February 19, 2015 01:18 AM2015-02-19T01:18:44+5:302015-02-19T01:18:44+5:30

मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करू, अशा वल्गना करण्यातच राज्य शासन गुरफटलेले असताना राज्यात मात्र ‘स्वायत्त मराठी विद्यापीठा’ची मुहूर्तमेढ रोवली जात आहे.

First Marathi University in Badlapur | पहिले मराठी विद्यापीठ बदलापूरला

पहिले मराठी विद्यापीठ बदलापूरला

Next

पुणे : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊ, मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करू, अशा वल्गना करण्यातच राज्य शासन गुरफटलेले असताना राज्यात मात्र ‘स्वायत्त मराठी विद्यापीठा’ची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. या विद्यापीठामध्ये प्रवेशासाठी ना शिक्षणाची अट असेल, ना कुठला शैक्षणिक अभ्यासक्रम किंवा परीक्षेचा ससेमिरा असेल. केवळ मराठी भाषा समृद्ध करण्याच्या दृष्टीबरोबरच मातृभाषेचे व्यावहारिक मूल्य निर्मित होण्यासाठी वातावरण विकसित करणे हाच या विद्यापीठ निर्मितीचा प्रांजळ हेतू राहणार आहे. कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंती म्हणजेच मराठी भाषा दिनी या विद्यापीठाचे लोकार्पण होणार असून, ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांची या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली आहे.
शासनस्तरावर मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ उभारण्यासाठी अद्याप कोणतीही पावले उचलली गेलेली नाहीत. हे विद्यापीठ निर्मित करण्यासाठी बदलापूर, अंबेजोगाई किंवा विदर्भ अशा काही जागा प्रस्तावित करण्यात आल्या असल्याचे समजते. एकीकडे शासनदरबारी विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भातही प्रक्रिया सुरू असताना, शासनाचे कोणतेही सहकार्य न घेता केवळ लोकवर्गणी आणि लोकसहभातून ‘ग्रंथसखा’ वाचनालय बदलापूर या संस्थेने पहिले अभिनव स्वायत्त मराठी विद्यापीठ सुरू करून समाजासमोर वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे. साहित्यिकांच्या दहा वर्षे सुरू असलेल्या या प्रयत्नांना मराठी भाषा दिनी मूर्त रूप प्राप्त होणार आहे. यानिमित्ताने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘समाज हा माहिती आणि मनोरंजनात गुंतला असून, समस्त समाजाला ज्ञानाभिमुख करण्याचे कार्य हे विद्यापीठ करेल. या विद्यापीठाचा शासनाशी कसलाही संबंध नाही. विद्यापीठ अनुदान मंडळाची मान्यता घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; कारण या विद्यापीठातर्फे आम्ही कसल्याही परीक्षा घेणार नाही किंवा कोणालाही प्रमाणपत्रे देणार नाही. येथे प्रवेशासाठी शिक्षणाची अट नाही, वाचनाच्या इयत्तेवरच येथील शिक्षण अवलंबून असेल. या विद्यापीठाला शासन मान्यतेची गरज नाही.’’
या विद्यापीठाची सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच भाषेचे अनोखे संग्रहालय येथे सुरू करण्यात येणार आहे. मराठी भाषेसंदर्भात विविध कामे हाती घेण्यात येतील, असेही ते म्हणाले. दरम्यान, धर्मदाय आयुक्तांकडे संस्थेची नोंदणी झाली असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी प्रा. मिलिंद जोशी, डॉ. सदाशिवराव शिवदे, रवींद्र गुर्जर, मंदार जोगळेकर व श्याम जोशी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

दोन लाख ग्रंथाचे समृद्ध दालन
१ विद्यापीठाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त २७ व २८ फेबु्रवारी रोजी संकल्पपूर्ती संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते ग्रंथदालनाचे उद्घाटन होणार आहे. सुमारे दोन लाख ग्रंथांचे हे समृद्ध दालन असेल.
२ दहा हजार दिवाळी अंकांचा दिवाळी फराळ येथे उपलब्ध असेल. २७ तारखेला ‘मराठीचे खरे मारेकरी कोण?’ या विषयावर होणाऱ्या परिसंवादात डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, वसंत आबाजी डहाके, भानू काळे, मीना वैशंपायन आणि मोनिका गजेंद्रगडकर भूमिका मांडणार आहेत.

३ २८ तारखेला ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत प्रा. मिलिंद जोशी घेणार आहेत. दुसऱ्या सत्रात मराठीची खरी सेवा करणारे ‘आदर्श जोडपे’ म्हणून डॉ. उमा व विरूपाक्ष कुलकर्णी या दाम्पत्याला विद्यापीठातर्फे गौरववृत्ती प्रदान केली जाईल.

४महाराष्ट्राचा वाङ्मयीन नकाशा तयार करणे.
४ एम.ए.च्या परीक्षेत दिवाळी अंकांच्या अभ्यासाला स्थान मिळवून देणे आणि स्वतंत्र शंभर गुणांचा अभ्यासक्रम करणे.
४ मराठी भाषा, इतिहास, संस्कृतीचा परिचय करून देणाऱ्या अभ्यास पुस्तिका तयार करणे.
४मराठीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणांचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करणे.

 

Web Title: First Marathi University in Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.