Welcome! पुण्यात दाखल होणार पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस! लोणी स्थानकावर चार टँकर उतरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 10:40 AM2021-05-11T10:40:13+5:302021-05-11T14:25:37+5:30
पुणे विभागाची तयारी पूर्ण
पुणे: पुण्यात अंगुल (ओरिसा ) येथून मंगळवारी रात्री ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल होणार आहे. लोणी स्थानकावर बांधण्यात आलेल्या रॅम्पवर रात्री ऑक्सिजनचे चार टँकर उतरतील. हे व्हाया नागपूर ,दौंड मार्गे लोणीत दाखल होतील. पुणे विभागात दाखल होणारी ही पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस असणार आहे.
देशात व राज्यात ऑक्सिजनची निर्माण झालेली कमतरता दूर करण्यासाठी रेल्वेने वेगवेगळ्या भागांतून ऑक्सिजन टँकरचा पुरवठा करत आहे. पुणे रेल्वे विभागाने तीन ठिकाणी रॅम्पची सोय करून टँकर उतरवण्याची व्यवस्था केली . यात खडकी, लोणी व कोल्हापूर येथील गुर मार्केटचा समावेश आहे. मागच्या वेळी कळंबोली हुन निघालेल्या ऑक्सिजन एक्सप्रेसला भुसावळ रेल्वे विभागत तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. परिणामी रेल्वेला विशाखापट्टणमला पोहचण्यास वीस तासा पेक्षा अधिक विलंब झाला होता. मात्र ती अडचण दूर करण्यात आली. मंगळवारी सकाळी काही टँकर नागपूर स्थानकावर उतरविण्यात येतील. उर्वरित चार टँकर पुण्याच्या दिशेने रवाना होतील. रात्री आठ ते नऊ च्या दरम्यान हे टँकर लोणीला पोहचतील.
खडकी ही पर्यायी व्यवस्था
रेल्वे प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून खडकी स्थानकावर देखील रॅम्प बांधून तयारी पूर्ण केली आहे. जर लोणी स्थानकावर काही अडचण आली तर खडकी स्थानकावर टँकर उतरवले जाऊ शकते. मात्र तशी शक्यता कमीच आहे .
सुरक्षितता आणि वेग रेल्वेपुढे आव्हान
लिक्विड स्वरूपात असलेल्या ऑक्सिजन टँकरची वाहतूक करताना रेल्वेला वेग आणि सुरक्षितता याचा मेळ घालावा लागत आहे. क्रायोजिनिक टँकरच्या माध्यमातून ऑक्सिजनची वाहतूक होत आहे. यासाठी मायनस १८५ अंश सेल्सियस तापमान असावे लागते. शिवाय त्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेने यासाठी ४० ते ५० किमी प्रतितास इतका वेग निर्धारित केला आहे.