पुण्यात आज ओरिसातून येणार पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:12 AM2021-05-11T04:12:22+5:302021-05-11T04:12:22+5:30
पुणे : अंगुल (ओरिसा) येथून पुण्यासाठी ऑक्सिजन घेऊन निघालेली खास रेल्वे मंगळवारी (दि. ११) रात्री पुण्यात पोहोचणार आहे. नागपूर. ...
पुणे : अंगुल (ओरिसा) येथून पुण्यासाठी ऑक्सिजन घेऊन निघालेली खास रेल्वे मंगळवारी (दि. ११) रात्री पुण्यात पोहोचणार आहे. नागपूर. दौंडमार्गे लोणी स्थानकावर रात्री पोहोचणारे चार टँकर उतरवण्यासाठी विशेष रॅम्प बांधण्यात आला आहे. पुणे विभागात दाखल होणारी ही पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस असणार आहे.
देशात व राज्यात ऑक्सिजनची निर्माण झालेली कमतरता दूर करण्यासाठी रेल्वेने वेगवेगळ्या भागांतून ऑक्सिजन टँकरचा पुरवठा केला जात आहे. पुणे रेल्वे विभागाने तीन ठिकाणी रॅम्पची सोय करून टँकर उतरविण्याची व्यवस्था केली. यात खडकी, लोणी व कोल्हापूर येथील गूळ मार्केटचा समावेश आहे.
मागच्या वेळी कळंबोलीहून निघालेल्या ऑक्सिजन एक्स्प्रेसला भुसावळ रेल्वे विभागत तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. परिणामी रेल्वेला विशाखापट्टणमला पोचण्यास वीस तासांपेक्षा अधिक विलंब झाला होता. मात्र ती अडचण दूर करण्यात आली. मंगळवारी सकाळी काही टँकर नागपूर स्थानकावर उतरविण्यात येतील. उर्वरित चार टँकर पुण्याच्या दिशेने रवाना होतील. रात्री आठ ते नऊच्या दरम्यान हे टँकर लोणीला पोहचतील.
चौकट
खडकी ही पर्यायी व्यवस्था
रेल्वे प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून खडकी स्थानकावर देखील रॅम्प बांधून तयारी पूर्ण केली आहे. जर लोणी स्थानकावर काही अडचण आली तर खडकी स्थानकावर टँकर उतरविले जाऊ शकते. मात्र तशी शक्यता कमीच आहे.
चौकट
सुरक्षितता आणि वेगाचे आव्हान
लिक्विड स्वरूपातील ऑक्सिजन टँकरची वाहतूक करताना रेल्वेला वेग आणि सुरक्षितता याचा मेळ घालावा लागत आहे. क्रायोजेनिक टँकरच्या माध्यमातून ऑक्सिजनची वाहतूक होत आहे. यासाठी वजा १८५ अंश सेल्सियस तापमान असावे लागते. शिवाय त्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेने वाहतुकीसाठी ४० ते ५० किमी प्रतितास इतका वेग निर्धारित केला आहे.