‘प्राण’ घेऊन धडधडत पोहोचली पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:13 AM2021-05-12T04:13:11+5:302021-05-12T04:13:11+5:30
प्रसाद कानडे लोणी काळभोर : अवघ्या ३७ तासांत १७२५ किमीचे अंतर पार करीत अंगुलहून (ओरिसा) निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस मंगळवारी ...
प्रसाद कानडे
लोणी काळभोर : अवघ्या ३७ तासांत १७२५ किमीचे अंतर पार करीत अंगुलहून (ओरिसा) निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस मंगळवारी (दि. ११) रात्री साडेअकराच्या सुमारास लोणी स्थानकात धडधडत दाखल झाली. गाडीला ग्रीन कॉरिडॉर दिला असल्याने फक्त क्रु (चालक व गार्ड) बदलण्यासाठी ही गाडी केवळ काही मिनिटांचा थांबा घेऊन लगेच पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होत होती. रो-रो सेवेद्वारे चार टॅंकर आणण्यात आले. यातून ५५ टन ऑक्सिजनची पहिली खेप पुण्यात पोहोचली आहे. पुणे विभागात दाखल झालेली ही पहिलीच, तर महाराष्ट्रसाठी ही पाचवी ऑक्सिजन एक्स्प्रेस ठरली.
अंगुल येथून सोमवारी सकाळी साडेदहा वाजता चार टॅंकरसह ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपूरच्या दिशेने रवाना झाली. मंगळवारी सकाळी सव्वासहा वाजता ती नागपूर स्थानकावर दाखल झाली. क्रु बदलून तत्काळ ही गाडी लोणीसाठी साडेसहा वाजता मार्गस्थ झाली. गाडीला ग्रीन कॉरिडॉर असल्याने मार्गात गाडीला सर्वच सिग्नलवर ग्रीन सिग्नल देण्यात आला. त्यामुळे गाडीची गती जरी ताशी ५० ते ६० किलोमीटर इतकी कमी असली, तरीही ग्रीन कॉरिडॉरमुळे वेळेत मोठ्या प्रमाणात बचत केली गेली.
चौकट
शंटिंग लाईनला जोडले रॅम्प
लोणी स्थानकावरील इंजीनच्या शंटिंग लाईनला जोडूनच नव्याने रॅम्प तयार करण्यात आले. याच लाईनवर ऑक्सिजन एक्स्प्रेस आणण्यात आली. यावेळी येथे लाईटची सोय देखील करण्यात आली. यावेळी रेल्वे प्रशासनासह जिल्हा प्रशासनचे अधिकारी उपस्थित होते.
चौकट
हवा भरण्यासाठी एक तास
टॅंकरची वाहतूक करताना सुरक्षेच्या कारणास्तव टॅंकरच्या चाकातील हवा काढून टाकली जाते. गाडी रॅम्प वर उतरून घेताना पुन्हा हवा भरावी लागते. हवा भरण्यासाठी चार कम्प्रेसरची सोय करण्यात आली. शिवाय कम्प्रेसर रुळांजवळून दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागले तर त्या साठी दोन रिक्षा देखील आणून ठेवण्यात आल्या होत्या. एका टॅंकरमध्ये हवा भरण्यासाठी किमान एक तास लागला.