जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सव्वा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:16 AM2020-12-30T04:16:25+5:302020-12-30T04:16:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात येणाऱ्या नवीन वर्षांत जिल्हा प्रशासनाला कोविड-१९ चे लसीकरण हे मोठे आव्हान असून, शासनाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात येणाऱ्या नवीन वर्षांत जिल्हा प्रशासनाला कोविड-१९ चे लसीकरण हे मोठे आव्हान असून, शासनाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात तब्बल एक लाख दहा हजार ४३४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन सुरू आहे. यासाठी लस देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती ‘कोविन’ या पोर्टलवर भरणे, लस साठवण क्षमता तयार करणे, यासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे.
जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यात २५३ शासकीय आरोग्य संस्था व खाजगी आरोग्य संस्था ८ हजार ८९ अशा एकूण ३ हजार ८४२ खाजगी व शासकीय संस्थांची संख्या आहे. यात शासकीय आरोग्य कर्मचारी २४ हजार ७३९ तर खाजगी आरोग्य कर्मचारी ८५ हजार ६९५ येवढे आहेत. यामुळे पहिल्या टप्प्यात प्रशासनाला एक लाख १० हजार ४३४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस द्यावी लागणार आहे. या सर्व शासकीय व खाजगी संस्था तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती ‘कोविन’ या पोर्टलवर भरण्यात येत आहे.
चौकट
या मोहिमेत पहिल्या टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना (शासकीय आरोग्य संस्था, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र तसेच खाजगी आरोग्य संस्था) यांना लसीकरण करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये इतर संलग्न आजार असलेले रुग्ण व वयोवृद्ध यांचा समावेश करण्यात येईल व तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांचा समावेश करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
चौकट
असे होणार लसीकरण
-कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यात २ हजार ५४६ लस टोचक नेमण्यात येणार.
-लसीकरणात प्रत्येकी २ डोस २८ दिवसांच्या अंतराने दिले जाणार.
-लस साठवणीसाठी १८५ आय.एल.आर. व १५७ डीफ्रीजर आहेत.