जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर कारखाना देशात प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 03:06 PM2019-08-29T15:06:59+5:302019-08-29T15:09:56+5:30

संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे म्हणजेच १० लाख ७५ हजार ०७५ मे. टन इतक्या उसाचे गाळप केले असून, त्यापासून १२ लाख ५३ हजार ९२० क्विंटल साखर उत्पादन झालेले आहे.

first prize got by shri Vighnhar factory in Junnar taluka in country | जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर कारखाना देशात प्रथम

जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर कारखाना देशात प्रथम

googlenewsNext
ठळक मुद्देतांत्रिक कार्यक्षमतेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार : सलग तिसऱ्यांदा मिळाला मान

नारायणगाव :  राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लिमिटेड, नवी दिल्ली यांच्या वतीने गाळप हंगाम २०१८-१९ साठी देण्यात येणाऱ्या तांत्रिक कार्यक्षमतेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला सलग तिसऱ्यांदा देण्यात आला आहे.
संपूर्ण देशातील भारतीय कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष विजयपॉल शर्मा यांच्या शुभहस्ते, तसेच नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्लीचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, उपाध्यक्ष केतन पटेल, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे दि.२८ रोजी प्रदान करण्यात आला. विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप आणि संचालक मंडळातील सर्व सदस्य व अधिकारी आणि कामगार युनियनचे पदाधिकारी यांनी तो स्वीकारला.

या पुरस्काराबद्दल बोलताना विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर म्हणाले की , श्री  विघ्नहर कारखान्याने गत हंगामात तांत्रिक कार्यक्षमतेचा पूर्ण क्षमतेने वापर करत दैनंदिन ऊस गाळप क्षमता ५००० मे.टन असतानाही सुमारे ६००० मे.टन प्रतिदिनी गाळपाचा वेग ठेवून सरासरी ११२ टक्के क्षमतेचा वापर करत, संपूर्ण पुणे जिल्ह्यात उच्चांकी असे प्रथम क्रमांकाचे म्हणजेच १० लाख ७५ हजार ०७५ मे. टन इतक्या उसाचे गाळप केले असून, त्यापासून १२ लाख ५३ हजार ९२० क्विंटल साखर उत्पादन झालेले आहे. त्याचबरोबर ११.६५% साखर उतारा राखण्यात यश मिळविले. सहवीजनिर्मिती आणि डिस्टिलरी प्रकल्प पूर्णक्षमतेने चालवून सहवीजनिर्मिती प्रकल्पातून ४ कोटी ५२ लाख ३३ हजार युनिट वीज निर्यात केली असून, डिस्टिलरीमधून ५४ लाख १४ हजार लिटर अल्कोहोल निर्मिती केलेली आहे.  कमीत कमी स्टॉपेजेस, वाया जाणाऱ्या साखरेचे प्रमाण, स्टीमचा वापर,  विजेचा वापर, जास्तीत जास्त मिल एक्स्ट्रॅक्शन, बॉयलिंग हाऊस रिकव्हरी, बगॅस सेव्हिंग या सर्वबाबींचा विचार होऊन विघ्नहर कारखान्यास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .
शेरकर पुढे म्हणाले की, संपूर्ण देशातील तांत्रिक कार्यक्षमतेचा सलग तिसऱ्यांदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला, त्यामुळे श्री विघ्नहरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्यादृष्टीने ही अतिशय अभिमानाची बाब असून, माजी खासदार स्व. निवृत्तीशेठ शेरकर व माजी चेअरमन स्व.सोपानशेठ शेरकर यांच्या आदर्शाप्रमाणे विघ्नहर कारखान्याची यशोपताका अधिकाधिक उंचावली जात असून व्हाईस चेअरमन, सर्व संचालक यांच्या साथीने व सर्व सभासद बंधू-भगिनी, ज्येष्ठांचा आशीर्वाद, ऊसउत्पादक, अधिकारी व कर्मचारीवर्ग आणि तरुणवर्गाच्या सहकार्याने विघ्नहर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे सत्यशील शेरकर यांनी स्पष्ट केले. आगामी सन २०१९-२० गाळप हंगामात सुमारे ९ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने गाळप हंगामाची जोरदार तयारी सुरु असल्याचे शेरकर यांनी संगितले.

Web Title: first prize got by shri Vighnhar factory in Junnar taluka in country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.