Pune: पहिला 'पुलकित सन्मान' शि. द. फडणीस यांना जाहीर
By नम्रता फडणीस | Published: November 3, 2023 09:21 PM2023-11-03T21:21:54+5:302023-11-03T21:22:35+5:30
शि. द. फडणीस यांनी महाराष्ट्रात आपल्या चित्रशैलीने ठसा उमटवला आहे....
पुणे : चित्रकार आणि पु.ल.प्रेमी असलेले शि. द. फडणीस यांना पहिला ‘पुलकित सन्मान’ जाहीर झाला असून, हा पुरस्कार सोहळा बुधवारी (दि. ८) रोजी सायंकाळी ६ वाजता ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती आशय फिल्म व सांस्कृतिक क्लबचे सचिव वीरेंद्र चित्राव व सतीश जकातदार यांनी दिली.
शि. द. फडणीस यांनी महाराष्ट्रात आपल्या चित्रशैलीने ठसा उमटवला आहे. त्यांची विनोदी व्यंगचित्रे पाहून अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या व्यंगचित्रांमुळेच चित्रकला सामान्यांपर्यंत पोहोचली. त्यांची ठसठशीत आणि लयबद्ध शैली पाच दशकांहून अधिक झाली आहे. समाजातील विसंगती टिपणारे अनेक प्रसंग त्यांनी व्यंगचित्रांतून रेखाटले आणि विसंगतीतून किती निर्विष व सुखावणारा विनोद निर्माण करता येतो, याचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांच्या शब्दविरहित,बोलक्या चित्रांनी नियतकालिकांची, पुलंसारख्या अनेक दिग्गज लेखकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे सजली. त्यांचे व्यंगचित्र क्षेत्रातील भरीव योगदान विचारात घेत त्यांना पहिला 'पुलकित सन्मान' प्रदान केला जाणार आहे.
या सन्मान सोहळ्यानंतर 'पुल नावाचे संचित' या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे. यात चंद्रकांत काळे, किरण यज्ञोपवित, श्रीरंग गोडबोले, गजेंद्र आहिरे, मुक्ता पुणतांबेकर, रवी मुकुल हे आपले विचार मांडणार असून, राजेश दामले सूत्रसंचालन करणार आहेत.