संचारबंदीचा आदेश न पाळल्याप्रकरणी राज्यातील पहिली शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 12:36 AM2020-04-02T00:36:18+5:302020-04-02T00:42:44+5:30
शासकीय यंत्रणा लॉक डाऊनचे वारंवार समजावून सांगत असताना त्याकडे सपशेल दुर्लक्ष करणाऱ्यांना पहिला दणका बसला आहे. पुणे जिल्ह्यातील संचारबंदीच्या उल्लंघनाविरोधात पहिली शिक्षा बारामती न्यायालयाने ठोठावली आहे.
पुणे :शासकीय यंत्रणा लॉक डाऊनचे वारंवार समजावून सांगत असताना त्याकडे सपशेल दुर्लक्ष करणाऱ्यांना पहिला दणका बसला आहे. पुणे जिल्ह्यातील संचारबंदीच्या उल्लंघनाविरोधात पहिली शिक्षा बारामतीन्यायालयाने ठोठावली असून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींना तीन दिवस कैद किंवा ५०० रुपये दंड ही शिक्षा सुनावली आहे.
अफजल बनीमिया आत्तार (वय 39 रा.श्रीरामनगर ता.बारामती जि.पुणे.), चंद्रकुमार जयमंगल शहा (वय 38 रा.सुर्यनगरी ता.बारामती, जि.पुणे ), अक्षय चंद्रकांत शहा (वय 32 रा.वडगाव निंबाळकर ता.बारामती जि.पुणे ) अशी आरोपींची नावे आहेत.
राज्यात संचारबंदी लागू असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही कामासाठी नागरिकांनी बाहेर पडू नये असे आवाहन सरकारने वारंवार केले आहे. मात्र तरीही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करून बाहेर पडताना आढळत आहेत. अखेर या हट्टी आणि नियम मोडणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. कलम १८८ अंतर्गत ही कारवाई सुरु झाली असून राज्यातली पहिली शिक्षा बारामती न्यायालयाने सुनावली आहे. ही शिक्षा जरी लहान असली तरी संबंधित व्यक्तींना त्याचा मोठा तोटा होणार आहे. भविष्यकाळात चारित्र्य पडताळणीमध्ये शिक्षा झाली म्हणून कोणतीही शासकीय किंवा खाजगी नोकरी त्यांना मिळणार नाही. त्यामुळे ही घटना बघून आता तरी नागरिकांनी विनाकारण बाहेर पडणे टाळावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.