पहिल्याच पावसाने पुणेकर सुखावले
By admin | Published: May 13, 2017 05:01 AM2017-05-13T05:01:08+5:302017-05-13T05:01:08+5:30
तब्बल ४१.१ अंश सेल्सिअस तापमानाने हैराण झालेल्या पुणेकरांना आज पावसाने दिलासा दिला. या हंगामातील पहिलाच पाऊस शुक्रवारी पुण्यात झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तब्बल ४१.१ अंश सेल्सिअस तापमानाने हैराण झालेल्या पुणेकरांना आज पावसाने दिलासा दिला. या हंगामातील पहिलाच पाऊस शुक्रवारी पुण्यात झाला.
आज दुपारी कडक ऊन होते; परंतु सायंकाळी साडेसहापासून वातावरणात बदल झाला. ढगांचा प्रचंड गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. सोसाट्याचा वाराही वाहत होता. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. शहर परिसरात तुरळक पाऊस पडला असला, तरी उपनगरांत पावसाचे प्रमाण जास्त होते. कात्रज, बिबवेवाडी परिसरात जोरदार पाऊस पडला. सिंहगड रस्ता, येरवडा, कोंढवा, कोथरूड, धायरीमध्येही पावसाने हजेरी लावली.
दरम्यान, शहर परिसरात उन्हाचा तडाखा कायम असून शुक्रवारी ४१.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा ३.६ अंशांनी अधिक आहे. शहराच्या किमान तापमानातही सरासरीपेक्षा २.४ अंशांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी २४.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी शहरात
काही भागात दुपार किंवा संध्याकाळनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. तसेच, पुढील
आठवडाभर ढगाळ वातावरण राहून दि. १८ मे रोजी काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या काळात शहराच्या कमाल व किमान तापमानात किंचित घट होईल, असा अंदाज आहे.