VIDEO: खडकवासला धरणातून पाण्याचा पहिला विसर्ग; मुठा नदीत ४२८ क्युसेकने सोडले पाणी
By राजू हिंगे | Published: July 25, 2023 07:41 PM2023-07-25T19:41:56+5:302023-07-25T19:42:44+5:30
खडकवासला धरण ९१ टक्के भरले...
पुणे :खडकवासलाधरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांत आतापर्यंत १८.५९ टीएमसी म्हणजे ६३.७७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला धरण ९१ टक्के भरले असल्यामुळे या धरणातुन मुठा नदीत ४२८ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरात दर गुरुवारी सुरू असलेली पाणीकपात रदद करण्याची मागणी शिवसेनेचा ठाकरे गट, मनसे आणि विविध स्वयंसेवी संस्थानी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
राज्यात जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. आता जुलै महिना निम्मा संपत आला असताना काही पावसाने पुन्हा जोर धरला आहे. गेल्या आठवड्यापासून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. यामुळे सोमवारी (दि.२५) सायंकाळी ५ वाजेपर्यंत या चारही धरणांत १८. ५९ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.
खडकवासला धरण ९१% भरले आहे. पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणातुन मुठा नदीत ४२८ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात दर गुरूवारी असणारी पाणी कपात रदद करावी अशी मागणी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे, संजय भोसले, बाळा ओसवाल, अशोक हरणावळ , अविनाश साळवे यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
खडकवासला धरणातून २०२३ मधील पाण्याचा पहिला विसर्ग; मुठा नदीत ४२८ क्युसेकने पाणी सोडले#KhadakwaslaDampic.twitter.com/9Ru9Uaaegf
— Lokmat (@lokmat) July 25, 2023
धरणातुन पाणी सोडले असताना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणी कपात रदद करण्याचा घाट का घातला जात आहे असा सवाल करून पाणी कपात तातडीने रद्द करावी. पुणेकरांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष साईनाथ बाबर, राजेद्र वागस्कर, वनिता वागस्कर, हेमंत संभुस, अमोल शिंदे यांनी दिला आहे.
पाणी कपात रद्द करा-
खडकवासला धरणातुन पाणी सोडले आहे. त्यामुळे येत्या गुरूवारपासुनच पाणी कपात रदद करावी अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.
धरण टीएमसी टक्के
खडकवासला १.८१ ९१. ८१
पानशेत ७.२३ ६७.८८
वरसगाव ७.८७ ६१. ४०
टेमघर १.६८ ४५. २३
एकूण १८.५९ ६३.७७
दिवसभरात झालेला पाऊस :
टेमघर - ३० मि.मी.
वरसगाव - २५ मि.मी.
पानशेत - २८ मि.मी.
खडकवासला - ५ मि.मी.