आईने दागिने गहाण ठेवले तेव्हा मिळाली पहिली रायफल; स्वप्निल कुसाळेने उलघडला डोळ्यांत पाणी आणणारा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 05:30 PM2024-08-29T17:30:36+5:302024-08-29T17:32:11+5:30
नेमबाजीवरून माझे लक्ष विचलित होऊ नये यासाठी आईवडीलांनी मला घरच्या अडचणी कधीही कळू दिल्या नाहीत. त्यामुळे वडिलांनी जमिनीचा तुकडा कधी विकला हे मला ठाऊक नाही
उमेश गो. जाधव
पुणे : ‘रेल्वेत नोकरी लागली तेव्हा मला क्रीडा प्रबोधिनी सोडावी लागली. त्यामुळे नियमानुसार क्रीडा प्रबोधिनीची रायफलही जमा करावी लागली. पण त्यावेळी नियमित सरावासाठी स्वत:ची रायफल असणं गरजेचं होतं. रायफल घेण्यासाठी चार लाख रुपये लागणार होते. वडिलांनी कर्ज काढले पण तरीही रक्कम पुरेशी नव्हती. त्यानंतर आईने दागिने गहाण ठेऊन मला रायफलसाठी पैसे दिले. आईने दागिने गहाण ठेवल्यानंतर मला पहिली रायफल मिळाली.’ डोळ्यांत पाणी आणणारा हा प्रवास ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसाळे याने उलगडला आहे.
‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्वप्निल म्हणाला की, वडील शाळेत शिक्षक होते आणि आई गृहिणी त्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे माझा नेमबाजी हा महागडा खेळ कुटुंबाला कसा परवडणार? हा प्रश्नच होता. पण आईवडीलांनी मला आधार दिला आणि कशाचाही विचार न करता सरावावर लक्ष देण्यास सांगितले. आई म्हणाली की आम्ही एकवेळ जेवू पण तुला काहीही कमी पडू देणार नाही. आईचे हे शब्द आजही मला सर्वोत्तम कामगिरीची प्रेरणा देतात.
नेमबाजीवरून माझे लक्ष विचलित होऊ नये यासाठी आईवडीलांनी मला घरच्या कोणत्याही अडचणी कधीही कळू दिल्या नाहीत. त्यामुळे वडिलांनी जमिनीचा तुकडा कधी विकला हे मला ठाऊक नाही. पण त्यांनी दिलेली जिद्द, प्रेरणा आणि आत्मविश्वास मला नेमबाजीत उंची मिळवून देईल असा विश्वास स्वप्निलने व्यक्त केला.
२००८मध्ये मी केवळ शारीरिक तंदुरुस्तीचा विचार करून सांगली येथे क्रीडा प्रबोधिनीत दाखल झालो. तेथे तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार क्रीडा प्रकार दिले जातात. त्यानुसार मला नेमबाजी आणि सायकलिंग हे क्रीडा प्रकार मिळाले होते. वर्षाअखेरीस येथे शारीरिक तंदुरुस्ती चाचणी घेतली जाते. या चाचणीतील गुण आणि शारीरिक तंदुरुस्तीचा विचार करून एक अंतिम क्रीडा प्रकार निवडायचा असतो. प्रबोधिनीतील चाचणीला जाण्याआधी मी टीव्हीवर युवा राष्ट्रकुल स्पर्धेतील नेमबाजी पाहत होतो. नेमबाजी टीव्हीवर पाहिली आणि हा खेळ मला आवडला. उत्सुकता निर्माण झाली त्यामुळे हाच खेळ निवडण्याचा निर्णय मी घेतला, असेही स्वप्निलने सांगितले.
स्वप्नाच्या दिशेने पाऊल
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून मी माझ्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. आता पुढील ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचे लक्ष्य आहे. त्यासाठी आता दिवसरात्र मेहनत घेण्याची तयारी आहे. त्यासाठी आतापासूनच वेळापत्रक तयार करत आहे, असेही स्वप्निल म्हणाला.