इयत्ता अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण; २९ हजार प्रवेश निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 12:12 PM2020-09-05T12:12:04+5:302020-09-05T12:12:46+5:30
दुसऱ्या फेरीची प्रक्रिया शनिवार (दि. ५) पासून सुरू होणार
पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाची पहिली नियमित फेरी पुर्ण झाली असून एकुण २९ हजार ४२७ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामुळे पुढील फेऱ्यांसाठी सुमारे ७७ जागा रिक्त राहिल्या आहेत. दुसऱ्या फेरीची प्रक्रिया शनिवार (दि. ५) पासून सुरू होणार आहे.
इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पध्दतीने राबविली जात आहे. एकुण १ लाख ६ हजार ७७५ प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी सुरूवातीला कोटा प्रवेशासाठी झिरो फेरी घेण्यात आली. त्यानंतर नियमित पहिली फेरी सुरू झाली. या दोन्ही फेऱ्यांमधून एकुण २९ हजार ४२७ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामध्ये नियमित फेरीतून २२ हजार ४८५ प्रवेश तर कोट्यातून ६९४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. शाखानिहाय प्रवेशामध्ये नियमित पहिल्या फेरीत विज्ञान शाखेत अॅलॉट केलेल्या १८ हजार ६४३ विद्यार्थ्यांपैकी ११ हजार ३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर वाणिज्य शाखेच्या १६ हजार २२३ विद्यार्थ्यांपैकी ९ हजार ३४५ तर कला शाखेतील ४ हजार ३३२ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ५४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
पहिल्या पसंती क्रमानुसार महाविद्यालय मिळालेल्या १९ हजार ५७५ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ३०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या अनुक्रमे ३ हजार ४१० आणि १ हजार ६११ विद्यार्थ्यांनीही संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे टाळल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
----------------
पहिल्या फेरीची स्थिती
एकुण प्रवेश क्षमता कॅप प्रवेश कोटा प्रवेश एकुण प्रवेश रिक्त
१,०६७७५ २२,४८५ ६,९४२ २९,४२७ ७७,३४८
--------------------------
पहिल्या फेरीतील शाखानिहाय प्रवेश
शाखा अॅलॉट झालेले प्रवेश निश्चित कोटा प्रवेश
कला ४,३३२ २,५४१ ६३१
वाणिज्य १६,२२३ ९,३४५ २,९४८
विज्ञान १८,६४३ ११,०३१ ३,२३३
व्होकेशनल ६८५ ६८५ १९८
--------------------------