दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये महाविद्यालयाचे पहिले सत्र सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:15 AM2021-09-15T04:15:29+5:302021-09-15T04:15:29+5:30
पुणे : कोरोनामुळे इयत्ता बारावीसह पदवी अभ्यासक्रमाचे निकाल उशिरा जाहीर झाल्याने शाळा व महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले. त्यामुळे ...
पुणे : कोरोनामुळे इयत्ता बारावीसह पदवी अभ्यासक्रमाचे निकाल उशिरा जाहीर झाल्याने शाळा व महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पहिले सत्र जून महिन्याऐवजी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे. परिणामी प्राध्यापकांच्या दिवाळीतील सुट्ट्या कमी करून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून २०२१ पासून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ सुरू केले जाईल, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, सप्टेंबर महिना उजाडला तरी अद्याप कला, वाणिज्य, विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे प्रवेश पूर्ण झाले नाहीत. तसेच निकाल लांबल्याने द्वितीय व तृतीय वर्षाची प्रवेश प्रक्रियासुद्धा पूर्ण झाली नाही. त्यातच अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, विधि, बी.एड, आदी अभ्यासक्रमाची प्रवेश पूर्व परीक्षा झाली नाही. त्यामुळे महाविद्यालयांचे प्रथम सत्र सुरू होऊ शकले नाही.
विद्यापीठाने नवीन शैक्षणिक सत्र सुरू करण्याबाबत सुधारित पत्रक प्रसिद्ध केले नाही. त्यामुळे प्रथम व द्वितीय सत्र केव्हा सुरू होणार ? ऑनलाईन असणार की ऑफलाईन याबाबत विद्यार्थी, प्राध्यापक व प्राचार्य यांच्यात संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, विद्यापीठातर्फे दिवाळीच्या सुट्ट्या कमी करून या कालावधीत विद्यापीठाचा अभ्यासक्रम पूर्ण केला जाणार आहे. परिणामी विद्यार्थी व प्राध्यापकांना ऐन दिवाळीच्या सणात अभ्यासाचे धडे गिरवावे लागणार आहेत.
-------------------------------
कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे शैक्षणिक सत्र जून महिन्यात नियमित कालावधीत सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्या कमी करून या कालावधीत विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जाणार आहे.
-डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.