नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 05:37 AM2018-05-03T05:37:09+5:302018-05-03T05:37:09+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेत नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम आला आहे.

First in the state of Nanded Shivaji Jakapure | नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम

नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम

Next

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेत नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम आला आहे. महिलांमधून सांगलीच्या शीतल बंडगर, तर मागासवर्गीयातून ठाण्यातील प्रमोद केदार प्रथम आले आहेत.
महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्यावतीने विक्रीकर निरीक्षक पदाच्या २५१ जागांसाठी ७ जानेवारी २०१८ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत खुल्या गटाचा कट आॅफ १२३ गुण, अनुसूचित जाती संवर्ग १२३, अनुसूचित जमातीचा ११४, इतर मागास वर्ग (ओबीसी) १२३, विशेष मागास प्रवर्ग १२८, डीटी (ए) १२७, एनटी (बी) १२८, शारीरिक अपंग १३० असा कटआॅफ लागला आहे.
सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षेसाठी राज्यातून ३ लाख ३० हजार ९०९ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेसाठी ४ हजार ४३० उमेदवार पात्र ठरले होते. त्यानंतर ७ जानेवारी २०१८ रोजी मुख्य परीक्षा पार पडली. या परीक्षेत १५६ इतके सर्वाधिक गुण मिळवून शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम आला आहे, असे आयोगाच्या उपसचिव विजया पडते यांनी सांगितले. विक्रीकर निरीक्षक पदाच्या २५१ जागांसाठी ३ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते.

डोंबिवलीकर श्रुती कानडेचे यश
डोंबिवली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ७ जानेवारीला घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेत (एसटीआय) डोंबिवलीतील श्रुती कानडे हिने राज्यात मुलींमध्ये (ओबीसी) प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पूर्वेतील गोग्रासवाडी परिसरातील मेघदूत इमारतीत राहणाऱ्या श्रुतीचे शालेय शिक्षण टिळकनगर विद्यामंदिर शाळेत झाले. तिने एमएससी बायोटेकचे शिक्षण मुलुंडमधील केळकर-वझे महाविद्यालयात घेतले. विक्रीकर निरीक्षकपदाच्या परीक्षेसाठी तिने कुठेही क्लास लावला नाही. तिला घरातूनच प्रोत्साहन मिळाले. श्री गणेश मंदिर संस्थानच्या लायब्ररीत बसून तिने अभ्यास केला. चिकाटी आणि मेहनत महत्त्वाची आहे. अपयशाने खचून जाऊ नका. प्रयत्न करा, यश नक्कीच मिळते, असा संदेश श्रुतीने दिला आहे.
तिचे वडील मनोहर हे पोलीस खात्यातून निवृत्त झाले आहेत, तर भाऊ श्रीकृष्ण हा पोलीस खात्यातच कमांडोपदावर आहे. आई मीनल गृहिणी आहे. तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे.

कल्याण : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात एसटी प्रवर्गात मुलींमध्ये बदलापूर येथे राहणारी आरती रमेश चव्हाण ही चौथी आली आहे. आरती पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. आपल्या या यशात मनोहर पाटील सर तसेच आईवडील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे तिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दररोज १० तास अभ्यास केल्याने हे यश मिळाल्याचे तिने यावेळी सांगितले.

Web Title: First in the state of Nanded Shivaji Jakapure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.