नगरसेवेचे पहिले पाऊल ‘अनधिकृत’
By admin | Published: March 5, 2017 04:34 AM2017-03-05T04:34:55+5:302017-03-05T04:34:55+5:30
महापालिका निवडणुकीत बाजी मारून पुणेकरांची सेवा करण्यासाठी नगरसेवक झालेल्या अनेक माननीयांनी महापालिकेत पहिले पाऊल टाकण्यापूर्वीच अनधिकृत कामांना सुरुवात
पुणे : महापालिका निवडणुकीत बाजी मारून पुणेकरांची सेवा करण्यासाठी नगरसेवक झालेल्या अनेक माननीयांनी महापालिकेत पहिले पाऊल टाकण्यापूर्वीच अनधिकृत कामांना सुरुवात केली आहे. निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांनी शहर व उपनगरांमध्ये ‘धन्यवाद’ची अनधिकृत फ्लेक्सबाजी केली आहे. त्यामुळे या माननीयांची पुढील वाटचाल कोणत्या दिशेने सुरू झाली आहे, याची जणू झलकच शहरभर पाहायला मिळत आहे.
महापालिका निवडणुकीच्या काळात आचारसंहितेमुळे सर्व अनधिकृत राजकीय फ्लेक्स काढण्यात आले होते. निवडून आलेल्या नगरसेवकांनी सुरू केलेल्या फ्लेक्सबाजीने शहराची ‘कोंडी’ केली आहे. प्रमुख रस्ते, चौक, पूल, सिग्नल अशा ठिकाणी नगरसेवक तसेच काही पक्षांनी फ्लेक्स लावले आहेत. मतदारांनी भरभरून दिलेल्या मतरूपी प्रेमाबद्दल धन्यवाद देणारे हे फ्लेक्स झळकत आहेत. मतदारांना हात जोडून धन्यवाद देणारे नगरसेवक तसेच वरिष्ठ नेत्यांची छायाचित्रेही या फ्लेक्सवर आहेत. नगरसेवकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अभिनंदनाचे फ्लेक्स लावले आहेत. त्यामुळे काही दिवस मोकळा श्वास घेणारे रस्ते, चौकांची या फ्लेक्सबाजीने घुसमट होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)
अनधिकृत फ्लेक्समुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याचे भानही माननीयांना राहिले नसल्याचे दिसते. दिवसागणिक या फ्लेक्सच्या संख्येत वाढच होत आहे. एका नगरसेवकाचा फ्लेक्स लागल्यानंतर लगेचच दुसरा नगरसेवक किंवा कार्यकर्त्यांकडून फ्लेक लावले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत पुणेकरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर म्हणाले, अनधिकृत फ्लेक्सबाबत उच्च न्यायालयाने कारवाईबाबतचे पालिका व पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र, त्यांच्याकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत. तसेच यासाठी स्वयंशिस्त पाळण्याचीही गरज आहे.