भारतात लठ्ठ श्वानावर पहिलीच शस्त्रक्रिया! वजनात तब्बल पाच किलोनं झाली घट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 01:17 PM2021-06-17T13:17:36+5:302021-06-17T13:23:35+5:30
लॅपरोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रोनोमी’ सर्जरी, अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी केली शस्त्रक्रिया
पुणे: वजन कमी करण्यासाठी अनेक जण शस्त्रक्रियेचा पर्य़ाय निवडतात, हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु, एका श्वानावर (कुत्री) वजन कमी करण्यासाठी ‘ लॅपरोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रोनोमी’ शस्त्रक्रिया करण्यात आली. लठ्ठपणा कमी करण्यासाठी कुत्र्यावर शस्त्रक्रिया होण्याची ही पहिलीच घटना आहे. हे ऐकल्यावर नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. लठ्ठपणा हा आजार असून माणसांप्रमाणे कुत्र्यांमध्येही लठ्ठपणा वाढतोय. पुण्यात अशाच एका ५० किलो वजन असलेल्या एका कुत्र्यांवर वजन कमी करण्यासाठी ही करण्यात आली आहे. यानंतर आठवड्याभरात श्वानाच्या वजनात तब्बल पाच किलोनं घट झाली आहे. त्यामुळे आता श्वानाचे वजन ४५ किलो इतके झाले आहे.
पुण्यातील कर्वेनगर येथील रहिवासी दारूवाला यांनी हा दिपीका नावाची कुत्री पाळली आहे. पाच वर्षांपूर्वी दिपिका घरी आल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण होते. सुरूवातीला ती घराच्या आसपास धावत राहायची, घरातील कामामध्येही मदत करत होती. कुटुंबातील इतर सदस्यांच्या सूचनेचेही पालन करत होती. परंतु, त्यानंतर तिला श्वास घेताना अडचण जाणवू लागली. श्वास घेता येत नसल्याने ती एकाच जागी बसून रहायची. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी औषधोपचार सुरू केले. दरमहा १० हजार रूपये औषधांसाठी खर्च करण्यात येत होता. परंतु, तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यानंतर सोशल मिडियावरून माहिती काढून कुटुंबियांनी पुणे येथील स्मॉल अॅनिमल क्लिनिकचे डॉ. नरेंद्र परदेशी यांची भेट घेतली. अतिरक्त वजन कमी करण्यासाठी आहारात बदल करून लेप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रोनोमी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर डॉ. शशांक शहा यांच्याशी चर्चा करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेमुळे श्वानाचं आयुष्यच बदलून गेलं आहे.
‘‘६ जूनला श्वानावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. श्वानाला भूल देऊन ही शस्त्रक्रिया करण्यात आली. साधारणतः दोन तास ही चालली. शस्त्रक्रियेपूर्वी १२ तास श्वानाला द्रव आहाराशिवाय काहीही खायला दिले नव्हते. साधारणतः प्रत्येक श्वानाचे वजन १८-२० किलो इतके असले पाहिजे. परंतु, या श्वानाचे वजन तब्बल ५० किलो एवढे होते. शस्त्रक्रियेनंतर श्वानाला सात दिवस चिकन सूपवर देण्यात येत होते. त्यानंतर अवघ्या पाच दिवसात श्वानाच्या वजनात पाच किलो घट झाली आहे. आता श्वानाचे वजन ४५ किलो आहे. सध्या श्वानाला व्यायामाचा सल्ला देण्यात आला आहे’’, असेही डॉ. परदेशी म्हणाले.