संत सोपानदेव मंदिरात 'विठू नामाचा गजर अन् राम कृष्ण हरीच्या जयघोषात' मेंढ्यांचे पहिले प्रतिकात्मक रिंगण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 05:55 PM2021-07-13T17:55:43+5:302021-07-13T17:56:17+5:30
दरवर्षी पालखी प्रस्थान झाल्यावर सहाव्या दिवशी बारामती तालुक्यातील पिंपळी- लिमटेक येथे मेंढ्यांचे रिंगण घेण्यात येते
सासवड: क्षेत्र पंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त संतांच्या पालख्यांचा पायी वारी सोहळ्याचे दिवस सुरु आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी रद्द झाली तरी नित्य कार्यक्रम मंदिरातच प्रतीकात्मक स्वरुपात सुरु आहेत. त्याच अनुषंगाने डोक्यावर तुळशी वृंदावन घेवून, टाळ - मृदुंगाचा गजर आणि राम कृष्ण हरी चा जयघोष करीत बारामती तालुक्यातील पिंपळी- लिमटेक येथील विसाव्याच्या ठिकाणचे मेंढ्यांचे पहिले रिंगण मंदिरात पार पडले. यावेळी उपस्थित भाविक भान हरपून विठू नामाचा गजर करीत होते. टाळ्यांचा कडकडाट, ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करीत स्वागत करण्यात आले.
सासवड येथून संत सोपानदेव महाराज पालखी प्रस्थान प्रतीकात्मक स्वरुपात पार पडल्यानंतर परंपरेनुसार आज पायी वारीचा सहावा दिवस आहे. आणि दुपारचा विसावा बारामती तालुक्यातील पिंपळी- लिमटेक येथे असतो. त्यामुळे वारी बंद असली तरी वारीतील विविध उपक्रमांची परंपरा खंडित होवू नये यासाठी मंदिरातच प्रतीकात्मक स्वरुपात मेंढ्यांचे रिंगण घेण्यात आले.
मंदिरात पहाटे काकडा आरती, महापूजा आणि सकाळी संगीत भजन पार पडल्यानंतर मंदिरात पंचपदी करून संतांचा अभंग घेण्यात आला. त्यानंतर डोक्यावर तुळशी वृंदावन, खांद्यावर भगवी पताका आणि गळ्यात टाळ मृदुंग घेवून हरिनामाचा गजर करीत मंदिर प्रदक्षिणा घेण्यात आली. तसेच हरिनामाच्या जयघोषात मेंढ्यानी संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालून रिंगण पूर्ण केले. यावेळी भाविकांनी ज्ञानोबा तुकाराम चा जयघोष करीत हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.