Maharashtra | आधी जाहिरात काढा, मगच ‘टेट’ परीक्षा घ्या; राज्यात शिक्षकांच्या ६५ हजार जागा रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 12:03 PM2023-01-31T12:03:17+5:302023-01-31T12:03:25+5:30

साडेचार हजार जागांसाठीची भरती प्रक्रिया रखडली...

First take the advertisement, then take the tet exam; 65 thousand posts of teachers are vacant in the state | Maharashtra | आधी जाहिरात काढा, मगच ‘टेट’ परीक्षा घ्या; राज्यात शिक्षकांच्या ६५ हजार जागा रिक्त

Maharashtra | आधी जाहिरात काढा, मगच ‘टेट’ परीक्षा घ्या; राज्यात शिक्षकांच्या ६५ हजार जागा रिक्त

googlenewsNext

- प्रशांत बिडवे

पुणे : राज्यात शिक्षकांच्या सुमारे ६५ हजार जागा रिक्त आहेत. याचा शैक्षणिक दर्जावर प्रतिकूल परिणाम होत आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे व्यवस्थेवर ताण येत असताना, राजकीय नेते केवळ पोकळ आश्वासने व घोषणाबाजी करत आहेत. शिक्षक भरतीसाठी आधीच विविध चाळण्या लावल्या आहेत. या कठीण परीक्षा उत्तीर्ण करूनही अनेक विद्यार्थी पदभरतीच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे आधी जागांची जाहिरात काढा आणि मगच अभियाेग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षा घ्या, अशी मागणी डीटीएड, बीएड स्टुडंट्स असाेसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरताना मंत्री महाेद्यांनी नुकतेच तीन महिन्यांत तीस हजार शिक्षकांची भरती करण्याचे अश्वासन दिले. मात्र, आजवर राज्यकर्त्यांकडून केवळ आश्वासने आणि घाेषणाबाजीच केली जात आहे. त्याला पात्रताधारक भावी शिक्षक वैतागले आहेत. शिक्षक अभियाेग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ‘टेट’ ही परीक्षा पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या आधीच घेतली जाते. या परीक्षेसाठी विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात आणि ती उत्तीर्ण होतात, परंतु यानंतर मात्र, पदांसाठी जाहिरातच काढली जात नाही. त्याामुळे या विद्यार्थ्यांचा मोठा हिरमोड होतो. एकीकडे वय वाढत असताना पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊनही विद्यार्थ्यांच्या हाती काहीच आलेले नसते, यामधून विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य वाढते. यामुळे टेट परीक्षा आधी घेऊन टप्प्याटप्प्याने भरतीप्रक्रिया न राबविता टीईटी पात्र उमेदवारांची एकत्रित परीक्षा घ्यावी आणि केंद्रीय पद्धतीने गुणवत्तेबाबत कटऑफ लावावा, अशी मागणी भावी शिक्षकांकडून हाेत आहे.

साडेचार हजार जागांसाठीची भरती प्रक्रिया रखडली

राज्यात पवित्र पोर्टलमार्फत २०१७ मध्ये १२ हजार १४७ पदांची शिक्षकभरती सुरू झाली. मात्र, त्यानंतर झालेल्या सत्तांतरानंतर भरती प्रक्रिया रेंगाळली. अद्याप उर्वरित सुमारे साडेचार हजार जागांवरील भरती प्रक्रिया लाल फितीत अडकलेली आहे. दरम्यान, ऑक्टाेबर, २०२२ मधील शासन निर्णयानुसार ज्या विभागात आकृतिबंध पूर्ण झाला आहे. त्या विभागात शंभर टक्के, तसेच ज्या विभागाचा आकृतिबंध अपूर्ण आहे, त्या विभागात रिक्त पदाच्या ८० टक्के जागा भरण्यासाठी वित्तविभागाची मान्यता मिळाली. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद आणि छावणी शाळांतील ३१ हजार ४७२ जागा आणि खासगी शिक्षण संस्थेमधील अशा एकूण शिक्षकांच्या ६५ हजार जागा रिक्त आहेत. त्यामुळे टीईटी पात्र झालेले उमेदवार, शासकीय, तसेच मराठी शाळा, समाजातील वंचित घटकांच्या शिक्षणाची तळमळ असेल, तर शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, असे संघटनेतर्फे सांगण्यात आले.

प्राथमिक शिक्षक संख्या

विभाग             / मंजूर पदे / कार्यरत पदे / रिक्त पदे

जिल्हा परिषद / २ लाख १९ हजार ४२८ / दाेन लाख / १९ हजार ४५२

महानगरपालिका / १९ हजार ९६० / ८ हजार ८६२ / ११ हजार ९८

नगरपरिषद शाळा / ६ हजार ३७ / ५ हजार १३६ / ९०१

छावणी शाळा / १६६ / १४५             / २१

 

राज्यकर्ते पाेकळ राजकीय आश्वासने देत, सुशिक्षित बेराेजगारांना झुलवत ठेवतात. सरकारने शासन निर्णयात बदल करावा आणि शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत जाहिरात आधी प्रसिद्ध करावी आणि त्यानंतर टेट परीक्षेचे आयाेजन करावे.

- संदीप कांबळे, उपाध्यक्ष, डीटीएड, बीएड स्टुडंट्स असोसिएशन.

Web Title: First take the advertisement, then take the tet exam; 65 thousand posts of teachers are vacant in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.