१०९ वर्षात पहिल्यांदाच महाराष्ट्र बँकेची ४१ हजार ६६६ कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:11 AM2021-03-21T04:11:31+5:302021-03-21T04:11:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील सहकारी संस्थांची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने गेल्या १०९ वर्षांच्या इतिहासात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील सहकारी संस्थांची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने गेल्या १०९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ४१ हजार ६६६ कोटी रुपये इतकी उच्चांकी उलाढाल यंदाच्या आर्थिक वर्षात केली आहे.
बँकेची १०९ व वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच ऑनलाईन झाली. यावेळी सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचा आढावा बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी घेतला. त्यावेळी ही माहिती त्यांनी दिली. “बँकेस गेल्यावर्षीप्रमाणेच ‘अ’ ऑडिट वर्ग मिळाला. बँकेला सव्वातीनशे कोटींचा निव्वळ नफा झाला,” असेही अनास्कर यांनी सांगितले. प्रशासक अनास्कर यांच्यासह व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख तसेच बँकेचे अनेक सभासद सभेला ऑनलाईन उपस्थित होते.
अहवाल वर्षात इतिहासात राज्य बँकेने प्रथमच एकूण ४१ हजार कोटींपेक्षा जास्त उच्चांकी उलाढाल केली. तसेच रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) राखणे आवश्यक असताना, राज्य बँकेने मार्च २०२० अखेर १३.११ टक्के इतके भांडवल पर्याप्तता प्रमाण राखले. अहवाल वर्ष अखेर बँकेचे नक्त मूल्य (नेटवर्थ) २ हजार २८२ कोटी रुपये असून बँकेचा स्वनिधी ४ हजार ७८४ कोटींपर्यंत पोहचले. अहवाल वर्षात बँकेला १ हजार ३४५ कोटींचा ढोबळ नफा झाला. तरतूदींनंतर सव्वातीनशे कोटींचा नक्त नफा झाला, अशी माहिती वार्षिक सभेत देण्यात आली.
बँकेने प्रथमच अनुत्पादक कर्जासाठी १०० टक्के तरतुद केल्याने निव्वळ अनुत्पादक कर्जाचे प्रमाण ० टक्के झाले आहे. नाबार्डने सक्षम बँकेचे जे २९ निकष दिले त्यापैकी राज्य बँक १९ निकष पूर्ण करत असून दहा निकषही सरासरी निकषापेक्षा काही अंशानी कमी आहेत. बँकेने आपले व्यवहार फक्त जिल्हा बँका अथवा साखर कारखान्यांपुरते मर्यादित ठेवले नाहीत. राज्यातील सर्व जिल्हा बँका, नागरी बँका, पतसंस्था, हाऊसिंग सोसायट्या व इतर सर्व सहकारी संस्थांच्या बाबतीत राबविलेल्या अनेक योजनांचा फायदा बँकेला झाल्याचे अनास्कर म्हणाले.