ऐकलंत का? २०१४ नंतर पुण्यात प्रथमच एका दिवसात ८० मिमी पावसाची बरसात; एकाच दिवसात सरासरी पार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 21:01 IST2021-07-24T20:53:02+5:302021-07-24T21:01:15+5:30
गेल्या काही वर्षातील जुलै महिन्यातील एकाच दिवसात सर्वाधिक पाऊस पडल्याची तिसरी वेळ आहे.

ऐकलंत का? २०१४ नंतर पुण्यात प्रथमच एका दिवसात ८० मिमी पावसाची बरसात; एकाच दिवसात सरासरी पार
पुणे : गेले काही दिवस कोकणाला झोडपून काढणार्या पावसाने शुक्रवारी पुण्यात धुवांधार बरसात केली. गेल्या २४ तासात शहरात तब्बल ८०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही वर्षातील जुलै महिन्यातील एकाच दिवसात सर्वाधिक पाऊस पडल्याची तिसरी वेळ आहे.
शहरात जुलै महिन्यात सरासरी १६७ मिमी पाऊस होता. पण जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून शहरात पावसाने जवळपास विश्रांती घेतली होती. ६ जुलैला १०. मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला होता. त्यानंतर २२ जुलैला सकाळपर्यंतच्या २४ तासात १७.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. १ जूनपासून तोपर्यंत २२३.८ मिमी पावसाची नोंद झाली होती. ती सरासरीच्या तुलनेत ५२.८ मिमी कमी होती.
२३ जुलै रोजी शहरात दिवसभर जोरदार पाऊस झाला. २४ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या मागील २४ तासात ८०.३ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत शहरात ३०९.७ मिमी पावसाची नोंद झाली असून ती सरासरीच्या तुलनेत २२ मिमीने अधिक झाली आहे. एकाच दिवसाच्या पावसाने सरासरी ओलांडली आहे.
१ जुलैच्या सकाळपर्यंत शहरात १५२ मिमी पावसाची नोंद झाली होती. ती सरासरीऐवढी होती. गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे जुलै महिन्यात १५७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी जुलै महिन्यात पडतो त्यापेक्षा अधिक पाऊस गेल्या दोन -तीन दिवसात पडला आहे.
..........
जुलै महिन्यात एकाच दिवसात सर्वाधिक पाऊस पडलेले दिवस व पडलेला पाऊस (मिमी)
२४ जुलै २०२१ - ८०.३
३ जुलै २०१६ - ७३.५
३० जुलै २०१४ - ८४.३
१५ जुलै २००९ - ९३.७
१९ जुलै १९५८ - १३०.४ (आजवरचा विक्रम)