बारामतीत प्रथमच उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:09 AM2021-06-02T04:09:53+5:302021-06-02T04:09:53+5:30
(रविकिरण सासवडे) लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : बारामती तालुक्यात या वर्षी पहिल्यांदाच करण्यात आलेला उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग यशस्वी ...
(रविकिरण सासवडे)
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : बारामती तालुक्यात या वर्षी पहिल्यांदाच करण्यात आलेला उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग यशस्वी झाला आहे. तालुक्यात २६.२० हेक्टर क्षेत्रावर हा प्रयोग करण्यात आला. हेक्टरी सरासरी २० ते २२ क्विंटल उत्पादन घेण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आणखी एका उन्हाळी पिकाचा पर्याय आता उपलब्ध होणार आहे.
तालुक्यातील बारामती व वडगाव निंबाळकर कृषि मंडळातील मुरूम, लाटे, पणदरे, माळेगाव व पाहुणेवाडी या गावांमधील ३४ शेतकऱ्यांना या उपक्रमात सहभाग घेतला होता. शेतकऱ्यांना खरिपाच्या तुलनेत उन्हाळी हंगामामध्ये कमी उत्पादन मिळाले असले तरी सोयाबीनला सध्या दर चांगला असल्याने उत्पन्नातील तफावत भरून निघण्यास मदत होणार आहे. तालुक्यात डिसेंबर २०२० च्या शेवटच्या आठवड्यात तर काही शेतकऱ्यांनी जानेवारी २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात टोकन पद्धतीने सोयाबीनची पेरणी केली. मध्यंतरी तापमानात झालेले बदल, तौक्ते चक्रीवादळ व उशिरा झालेली पेरणी यामुळे काही ठिकाणी उत्पादन कमी झाले.
या पिकासाठी फुले किमया, फुले संगम, एमएसीएस ११८८ आदी वाण वापरण्यात आले. पीक उन्हाळी असल्याने किडींचा प्रादुर्भाव कमी दिसून आला. तसेच तालुका कृषि विभागाच्या मार्गदर्शनानुसार एकात्मिक कीड व्यवस्थापन देखील करण्यात आले. सध्या सोयाबीनला दर चांगला असल्याने आगामी खरीप हंगामात बियाणे म्हणून हे सोयाबीन वापरता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदादेखील होणार आहे.
--------------------------
मागील अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे यंदा प्रथमच बारामती तालुक्यात उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाला आहे. उन्हाळी सोयाबीनचा ग्रामबीजोत्पादन प्रकल्प राबवण्याचे नियोजन आहे. सध्या उत्पादित झालेल्या घरगुती बियाणांच्या उगवणक्षमता तपासून त्या बियाणांचा सत्यतादर्शक बियाणांमध्ये समावेश करून खरीप हंगामातील पेरणीसाठी वापर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनची बीजप्रक्रिया करून घरगुती बियाणांची उगवणक्षमता तपासून पेरणी करावी.
- दत्तात्रय पडवळ
तालुका कृषि अधिकारी, बारामती
---------------------------
मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. उन्हाळी सोयाबीनमध्ये उत्पादन कमी असले. तरी उत्पादित सोयाबीनची उगवणक्षमता ९२ टक्क्यांपर्यंत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे उन्हाळी सोयाबीनसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाने अनुदान द्यावे.
- अशोक तावरे
प्रतिभा फार्मर प्रोड्युसर कंपनी, माळेगाव
-------------------------
सोयाबीनचे पीक उन्हाळी पीक म्हणून चांगला पर्याय ठरू शकते. या वर्षी पहिलाच प्रयोग असल्याने आम्हाला अनुभव नव्हता. मात्र पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात पेरण्या केल्यास पाण्याच्या तीन पाळ्यादेखील कमी होतील व उत्पादनातदेखील वाढ होईल.
- श्रीपाल सोरटे
शेतकरी, सोरटेवाडी
-------------------------
असा केला उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग
- या उपक्रमात तालुक्यातील ३४ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
- २६.१० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग झाला.
- सूक्ष्म सिंचन, टोकन पद्धतीचा वापर
- एकरी बियाणांचे प्रमाण कमी झाले.
- संतुलित खतांचा वापर
- एकात्मिक कीड व्यवस्थापन
- पाण्याच्या एकूण ९ पाळ्या
- हेक्टरी सरासरी २० ते २२ क्विंटल उत्पादन
-------------------------------
फोटो ओळी : बारामती तालुक्यात प्रथमच केलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकाची पाहणी करताना तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय पडवळ व शेतकरी.
०१.०६२०२१-बारामती-०२