आकाशवाणीच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय बातमीपत्र पुण्याहून प्रसारित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 08:32 PM2020-07-01T20:32:32+5:302020-07-01T20:33:08+5:30
पुणे : दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या मराठीच्या राष्ट्रीय बातम्या बुधवारपासून आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सुरू करण्यात आल्या. आकाशवाणीच्या इतिहासात राष्ट्रीय बातमीपत्र ...
पुणे : दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या मराठीच्या राष्ट्रीय बातम्या बुधवारपासून आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सुरू करण्यात आल्या. आकाशवाणीच्या इतिहासात राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्वाती महाळंक आणि अविनाश गोडबोले यांनी बातमीपत्राचे वाचन केले.
सुरुवातीच्या काळात सर्व प्रादेशिक राष्ट्रीय बातमीपत्रे दिल्लीतून प्रसारित केली जात होती. २०१७ मध्ये संबंधित राज्यांच्या राजधानी असलेल्या केंद्रांमध्ये बातमीपत्रे हस्तांतरित करण्यात आली. मराठीतील राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रातून सकाळी ८.३०, दुपारी १.३० आणि रात्री ८.३० वाजता दिले जात होते. गेले तीन महिने कोरोनाच्या संकटामुळे राष्ट्रीय बातमीपत्र बंद होते. मुंबईतील परिस्थिती अजूनही पूर्ववत झाली नसल्याने बुधवारपासून पुणे केंद्राहून बातमीपत्रास सुरुवात करण्यात आली, अशी माहिती आकाशवाणी वृत्त विभागाचे उपसंचालक नितीन केळकर यांनी दिली.
दिल्लीतील बातमीपत्राची वेळ वाढल्याने आता पुण्यातून सकाळी ९.२०, दुपारी १.३० आणि रात्री ९.२० असे तीन वेळा राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होणार आहे. याशिवाय सकाळी १० वाजून १० मिनिटांनी कोरोना महाराष्ट्र हे स्पेशल बुलेटिन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये कोरोना स्थितीचा ताजा आढावा, समाजपयोगी उपक्रम, उपाययोजना, ह्यूमन इंटरेस्ट बातम्या यावर भर दिला जात आहे. पुणे केंद्रातील हे बातमीपत्र राज्यातील सर्व केंद्रे प्रसारित करतात. हे बातमीपत्र गेल्या तीन महिन्यांपासून प्रसारित करण्यात येत आहे. यापूर्वी दिवसातून तीनदा सकाळी ७.१०, दुपारी ३ आणि रात्री ७ वाजता या तीन राज्य बातमीपत्रापैकी सकाळी ७.१० चे बातमीपत्र पुण्याहून प्रसारित होत होते.
वयाच्या पाचव्या वर्षांपासून माझे आकाशवाणीशी स्नेहबंध जुळले आहेत. २००५ पासून मी आकाशवाणीत कार्यरत असून राष्ट्रीय बातमीपत्र पुण्यात तयार करून वाचन करताना खूप छान वाटले. पहिले बातमीपत्र वाचण्याची संधी मला आणि अविनाश गोडबोले यांना मिळाली. यावेळी नितीन केळकर, मनोज क्षीरसागर उपस्थित होते.
- स्वाती महाळंक, वृत्तनिवेदिका