महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ५१ गडांवर 'असा' साजरा होणार 'शिवराज्याभिषेक दिन'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 10:05 PM2021-06-03T22:05:34+5:302021-06-03T22:06:15+5:30
प्रत्येक गडांशी निगडीत असलेल्या वीर स्वराज्य घराण्यांचे वंशज आणि परिसरातील ग्रामस्थ, वीर मावळे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे....
पुणे : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमत: राज्यातील तब्बल ५१ गडांवर भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन शिवराज्याभिषेक, स्वराज्यदिन साजरा होणार आहे. प्रत्येक गडांशी निगडीत असलेल्या वीर स्वराज्य घराण्यांचे वंशज आणि परिसरातील ग्रामस्थ, वीर मावळे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती 'गड तिथे शिवराज्याभिषेक दिन ; गड तिथे स्वराज्यदिन' सोहळ्याचे संकल्पक तसेच शिवजयंती महोत्सव समितीचे आद्यप्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.
पुण्यामध्ये दरवर्षी लालमहाल, एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, शनिवारवाडा यांसह अनेक ठिकाणी स्वराज्यगुढी उभारली जाते. यावर्षी देखील एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे स्वराज्यगुढी उभारुन पूजन होणार आहे.
नुकतेच शिवाजीनगर येथील एसएसपीएम संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या पहिल्या भव्यदिव्य अश्वारुढ स्मारकापाशी असलेल्या जगातील पहिल्या शिवराज्याभिषेक शिल्पाचे पूजन करुन, महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाचे पूजन करण्यात आले. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात पासलकर, जेधे, कंक, बांदल, मालुसरे, शिळीमकर, गोळे, गायकवाड, पायगुडे, मरळ, जगताप, धुमाळ, हाडे, जाधवराव, पवार या स्वराज्यघराण्यातील सदस्यांना भगवा स्वराज्यध्वज गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
अमित गायकवाड म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच ६ जून १६७४ हा दिवस भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे. शिवरायांनी स्वत:चा शक म्हणजेच शिवशक प्रारंभ करुन राजदंड हाती घेत सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम पवित्र सुवर्ण कलश रयतेच्या झोळी मध्ये रिता करुन रयतेची झोळी सुखसमृध्दी, स्वातंत्र्य, समाधानाने भरली. आणि म्हणुनच ६ जून स्वराज्यदिन विश्वव्यापी होण्यासाठी आम्ही ६ जुन २०१३ साला पासून भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, शहरात, राज्यात तसेच देशविदेशात उभारुन साजरा करत आहोत.
शिवरायांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंचशुभ चिन्हांनी अलंकृत भगवा स्वराज्यध्वज निर्माण करण्यात आला आहे. शिवनेरी, तोरणा, राजगड, सिंहगड, रायरेश्वर, तुंग-तिकोणा, पुरंदर, रोहिडेश्वर, पन्हाळा, रामशेज, संग्रामदुर्ग, लोहगड, रोहिडा, मल्हारगड, विसापुर, चाकण, राजमाची, विसापुर, इंदूरी, मोरगिरी, कोरीगड, धनगड, कैलासगड, तैलबैला, सोनेरी, वज्रगड, केंजळगड, मोहनगड, कावळा, वैराटगड, चंदनगड, वंदनगड, कमळगड, पांडवगड, कलनिधी, विशाळ गड,भुदरगड, सामान गड, भैरवगड, जीवधन, वसंतगड या गडांवर सोहळा साजरा होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन सोहळयाचे संकल्पक अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती गोळे, रवींद्र कंक, गणेश जाधव, समीर जाधवराव, अशोक सरपाटील, प्रवीण गायकवाड, संतोषराजे गायकवाड, सागर पवार, राजु सातपुते, संतोषराजे शिंदे यासह असंख्य स्वराजबांधवांनी केले आहे.