खुशखबर! इतिहासात प्रथमच म्हाडा काढणार गुढी पाडव्याला तब्बल २ हजार घरांची लाॅटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 07:22 PM2021-04-01T19:22:07+5:302021-04-01T19:23:16+5:30
कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा म्हाडाचा प्रयत्न : नितीन माने पाटील
पुणे : कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांची आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला असताना पुणे हौसिंग मंडळाच्या वतीने ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल २ हजार घरांची सोडत काढणार आहे. म्हाडाच्या इतिहासात प्रथमच पाडव्याला ऐवढ्या मोठ्याप्रमाणात घरांची सोडत काढणार आहे. कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा म्हाडाचा प्रयत्न असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितले.
कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक परिस्थिती खूपच बिघडली आहे. अशा स्थितीत गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाने पुढाकार घेतला आहे. ऐन कोरोना काळात जानेवारी २०२० मध्ये म्हाडाच्या वतीने इतिहासातील सर्वात मोठी म्हणजे तब्बल ५ हजार ६५७ घरांची सोडत काढून मोठा दिलासा दिला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या लाॅटरीला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला.
आता पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल २ हजार घरांची म्हाडा सोडत काढत आहे. यात म्हाडाच्या योजनेतील ६०० सदनिका व २० % सर्वसमावेशक गृहनिर्माण योजने अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या १३०० असे एकूण १९०० सदनिकांच्या संगणकीय सोडत काढण्यात येणार आहेत. यात दीड हजार घरे ही पुणे शहरातील नामांकित बिल्डरांकडची घरे असून, ही सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे नितीन माने-पाटील यांनी सांगितले.
--------