शंभर वर्षांत पहिल्यांदाच अकरा सर्परूपी सोमनाथांचे दर्शन
By admin | Published: April 25, 2017 03:59 AM2017-04-25T03:59:43+5:302017-04-25T03:59:43+5:30
: करंजे (ता. बारामती) येथील श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान या ठिकाणी शंभर वर्षांत पहिल्यांदाच एकाच वेळी एकरूपी तब्बल अकरा
सोमेश्वरनगर : करंजे (ता. बारामती) येथील श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान या ठिकाणी शंभर वर्षांत पहिल्यांदाच एकाच वेळी एकरूपी तब्बल अकरा सर्परूपी सोमनाथांनी भाविकांना दर्शन दिले. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी अकरा सर्परूपी सोमनाथांनी दर्शन दिल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरल्याने शेकडो भाविकांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली.
सोमायाचे करंजे हे प्रसिद्ध देवस्थान असून दरवर्षी श्रावण महिन्यात या ठिकाणी यात्रा भरते. या वेळी राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यानंतर वर्षातील दर सोमवारी या ठिकाणी बारामती तालुक्यासह जिल्हाभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. सोमवारी (दि. २४) असल्याने शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
सकाळी आठ वाजता सोमेश्वरनगर परिसरातील एकाच ठिकाणी एकसारखी दिसणारी सर्परूपी सोमनाथाने दर्शन दिले. हे सर्व सर्परूपी सोमनाथ सकाळपासूनच दर्शनासाठी आणून ठेवण्यात आले. एकाच वेळी अकरा सर्परूपी सोमनाथाने दर्शन दिल्याचे समजताच भाविक दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे धावू लागले.
गेल्या शंभर वर्षांत एकाच वेळी अकरा सर्परूपी सोमनाथांनी दर्शन दिले नसल्याने अनेक ज्येष्ठ भाविकांनी सांगितले. श्रावण महिन्यातदेखील चार ते पाचच सर्परूपी सोमनाथ दर्शन देतात, असे अनेकांनी सांगितले. मात्र, एकाच वेळी अकरा सर्परूपी सोमनाथांनी दर्शन देण्याची पहिलीच वेळ असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष रामदास भांडवलकर व सचिव हेमंत भांडवलकर यांनी सांगितले.