पुण्यात प्रथमच सर्वाधिक दोन लाख कोरोना लसींचे डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:12 AM2021-07-29T04:12:39+5:302021-07-29T04:12:39+5:30
बुधवारी जिल्ह्याला प्रथमच २ लाखांहून अधिक लसींचा पुरवठा झाला. यामध्ये १,७९,५०० कोविशिल्ड आणि ३३,००० कोव्हॅक्सिन लसींचा समावेश आहे. यापूर्वी ...
बुधवारी जिल्ह्याला प्रथमच २ लाखांहून अधिक लसींचा पुरवठा झाला. यामध्ये १,७९,५०० कोविशिल्ड आणि ३३,००० कोव्हॅक्सिन लसींचा समावेश आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात एकाच दिवशी दीड लाख लसींचा पुरवठा झाला होता.
जिल्ह्यात सध्या दररोज ५० ते ६० हजार लसीकरण केले जात आहे. गुरुवारी पुण्यातील १८६ लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड लसींचे डोस मिळणार आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्राला २०० डोस देण्यात येणार आहेत. ३३,००० कोव्हॅकसिन लसीपैकी पुणे ग्रामीणला १५,०००, पुणे शहराला ११,००० तर पिंपरी चिंचवडला ७००० डोस दिले जाणार आहेत. शहरातील ६ केंद्रांवर कोव्हॅकसिन लस उपलब्ध असणार आहे.
पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत ५८,४२,२४५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. . यामध्ये ४३,९१,६७९ जणांचा पहिला डोस, तर १४,५०,५६६ जणांचा दुसरा डोस घेऊन झाला आहे. पहिला डोस घेतलेले ५१ टक्के, तर दुसरा डोस घेतलेले १७ टक्के नागरिक आहेत.
------
राजेश टोपे यांच्या पुणे भेटीनंतर वेगाने फिरली सुत्रे?
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे २३ जुलै रोजी पुणे दौऱ्यावर होते. जिल्ह्याला पुरेसे डोस मिळत नसल्याची खंत अधिकाऱ्यांनी टोपे यांच्याजवळ व्यक्त केली होती. पुण्यात खाजगी रुग्णालयांकडे कोव्हीशिल्ड लसीचे पुरेसे डोस असताना, शासकीय केंद्रांना मात्र पुरेसे डोस मिळत नसल्याचे लक्षात आणून देण्यात आले होते. त्यावेळी लसींचा योग्य पुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुतोवाच टोपे यांनी केले होते.
कोट
बुधवारी दोन्ही लसींचे मिळून सुमारे सव्वा दोन लाख डोस मिळाले. एवढे डोस जिल्ह्याला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात दीड लाख डोस मिळाले होते.
- डॉ. संजय देशमुख, उपसंचालक, आरोग्य विभाग
-----
कोव्हीशिल्ड
पुणे ग्रामीण : ७८,५००
पुणे शहर : ६२,०००
पिंपरी चिंचवड : ३९,०००
----
एकूण : १,७९,५००
-----
कोव्हॅक्सिन
पुणे ग्रामीण : १५,०००
पुणे शहर : ११,०००
पिंपरी चिंचवड : ७,०००