पूर्व पुण्यातली पहिली लस ज्येष्ठ डॉक्टरांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:10 AM2021-01-17T04:10:25+5:302021-01-17T04:10:25+5:30
राजीव गांधी रुग्णालय : टप्प्याटप्प्याने लसीकरण लोकमत न्यूज नेटवर्क येरवडा : पुणे महापालिकेच्या येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात डॉ.सुभाष ...
राजीव गांधी रुग्णालय : टप्प्याटप्प्याने लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
येरवडा : पुणे महापालिकेच्या येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात डॉ.सुभाष कोकणे (वय ६९) यांना पहिली लस देण्यात आली. डॉ.सुभाष कोकणे हे येरवडा परिसरातील ज्येष्ठ डॉक्टर असून, पुणे महापालिका आरोग्य विभागासोबत गेली अनेक वर्षे सेवा करीत आहेत.
कोरोना महामारीत सुरुवातीच्या काळात सलग तीन महिने त्यांनी नायडू हॉस्पिटल येथे कोरोना रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचार दिले. त्यानंतर, ते स्वत: कोरोनाबाधित झाले होते. उपचार घेऊन पूर्णपणे बरे झाल्यानंतर, त्यांनी पुन्हा वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. पूर्वभागातील पहिली लस घेण्याचा मान त्यांना मिळाला.
लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी राजीव गांधी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर रांगोळी काढण्यात आली होती. सकाळी ११ वाजून दहा मिनिटांनी पहिली लस देण्यात आली. राजीव गांधी रुग्णालयात प्रत्यक्ष लसीकरण करताना लस घेणाऱ्या व्यक्तीला त्याबाबतची पूर्ण माहिती, लसीकरण करताना व त्यानंतर घ्यायची काळजी या सूचना संबंधित डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. लसीकरणानंतर कुठल्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही, अशी माहिती विभागीय आरोग्य अधिकारी डॉ.माया लोहार यांनी दिली.
राजीव गांधी रुग्णालयातील फार्मासिस्ट प्रशांत माने, डाटा एंट्री ऑपरेटर नीलेश सराईकर, डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या वतीने काम करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय कदम, कार्यालय अधीक्षक विनोद डोळस, परिचारिका पूजा बांदल या पाच व्यक्तींना पहिल्यांदा लस देण्यात आली. उर्वरित नोंदणीकृत व्यक्तींना दिवसभर टप्प्याटप्प्याने लसीकरण सुरू होते.
यावेळी आमदार सुनील टिंगरे, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, माजी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक अविनाश साळवे, नगरसेविका रेखा टिंगरे, अश्विनी लांडगे, शीतल सावंत, श्वेता चव्हाण, ऐश्वर्या जाधव, महापालिका सहायक आयुक्त विजय लांडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत, डॉ.स्वाती पाटील यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
चौकट
जास्तीतजास्त लोकांनी लाभ घ्यावा
“सरकारने नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन ही लस उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता लसीकरण करून घेतले पाहिजे. कोरोना आजाराला समूळ नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेचा नागरिकांनी जास्तीतजास्त लाभ घ्यावा.”
- डॉ.सुभाष कोकणे