वाघोलीत ७२आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम दिली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:10 AM2021-01-18T04:10:17+5:302021-01-18T04:10:17+5:30
लसीकरणाची तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असून बीजेएस कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना प्रथम टप्प्यात ...
लसीकरणाची तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असून बीजेएस कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना प्रथम टप्प्यात लस दिली जाणार आहे.
वर्षभरापासून थैमान घातलेल्या कोरोनाला शमविण्यासाठी केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर देशभरात कोरोना लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात केली असून, पुणे जिल्ह्यामध्ये ३६ हजार डोस लसीकरणासाठी उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात २१ केंद्रांवर लसीकरण केले जाईल. यामध्ये वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता लस उपलब्ध करून दिली आहे. लसीकरण करण्याबाबतची तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असून आरोग्य खाते यासाठी परिश्रम घेत आहे.
वाघोलीत लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेत असणारे फ्रंटलाईन कर्मचारी यांचे पहिल्या टप्प्यामध्ये लसीकरण केले जाणार असून, दुसऱ्या टप्प्यामध्ये पोलीस, ज्येष्ठ नागरिक व बीपी, शुगर असणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण होणार आहे. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी सचिन खरात, पर्यवेक्षक रामनाथ खेडकर, प्रल्हाद जाधव, डॉ. वर्षा गायकवाड, नागसेन लोखंडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
कोट
लसीकरण पथकाकडून दररोज नोंदणी झालेल्या १०० जणांना लस देण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी करू नये.
-सचिन खरात, तालुका आरोग्य अधिकारी, हवेली