भारतात अद्यापहीी काेराेनाची पहिली लाट अाेसरलेली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:10 AM2020-12-08T04:10:07+5:302020-12-08T04:10:07+5:30
डॉ. रमण गंगाखेडकर : कोरोनाच्या लसीकरणानंतरच ‘न्यू नॉर्मल’ शक्य राजानंद मोरे/प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : भारतातील कोरोनाची पहिली लाटच अद्याप ...
डॉ. रमण गंगाखेडकर : कोरोनाच्या लसीकरणानंतरच ‘न्यू नॉर्मल’ शक्य
राजानंद मोरे/प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : भारतातील कोरोनाची पहिली लाटच अद्याप ओसरलेली नाही. दुसरी लाट रोखायची असेल तर नागरिकांनी सुरक्षेचे नियम पाळणे आवश्यक आहे. सामुहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण झालेली नसल्याने लसीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लसीकरण होईपर्यंत आपण ‘न्यू नॉर्मल’ आयुष्य जगु शकणार नाही, असा स्पष्ट इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग व संसर्गजन्य आजार विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी ‘लोकमत’च्या विशेष मुलाखतीत दिला.
-----------
देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत काय सांगाल? दुसरी लाट येण्याची शक्यता आहे का?
- लॉकडाऊनमध्ये लोकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे आपल्याकडे प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर चार ते पाच महिन्यांनी कोरोनाची पहिली लाट आली. ती अद्याप अजूनही ओसरलेली नाही. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा अंदाज बांधता येणार नाही. वेगवेगगळ्या शहरांत वेगवेगळ्या वेळेत ही लाट येऊ शकते. दक्षता घेतली तर कदाचित आपण दुसऱ्या लाटेला रोखु शकु.
---------
जगभरात सुरू असलेल्या लशींच्या विकसन प्रक्रियेकडे कसे पाहता?
- जगात यापुर्वीही कधीही १० ते ११ महिन्यांमध्ये लस विकसित झाली नव्हती. सध्या भारताता आठ लसी चाचणीच्या विविध टप्प्यांवर आहेत. फायझर, मॉडर्ना, स्पुटनिक या लसींची परिणामकारकता ९० टक्क्यांहून जास्त असल्याचे दिसून आले. लस विकसित करताना प्रतिकारशक्ती जागृत करणाऱ्या स्पाईक प्रोटिनचा वापर करण्यात आला आहे. भारतातही या प्रोटिनचा वापर झाल्याने परिणामकारक निकाल हाती येतील.
---------------
लसीचा एक डोस घेतल्यानंतरही हरयाणाचे मंत्री कोरोनाबाधित झाले, यामुळे लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते का?
- चाचणीमध्ये ५० टक्के लोकांना प्रत्यक्ष लस आणि ५० टक्के लोकांना प्लासबो (अपरिणामकारक लससदृश द्रवपदार्थ) दिला जातो. या मंत्र्यांना प्रत्यक्ष लस मिळाली की प्लासबो दिला ते पाहावे लागेल. तसेच त्यांना दुसरा डोस दिला नव्हता. लस मिळाली असली तरी पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. त्यानंतरच प्रतिकारशक्ती निर्माण होते. मंत्र्यांना अर्धवट डोस झाल्याने लागण झाली. एकच डोस घेऊन जर आपण दक्षता घेतली नाही तर ते चुकीचे ठरू शकते. प्रत्येक व्यक्तीने दोन डोस घेणे जरूरीचे असते.
-----------------
कोरोनाला रोखण्यासाठी भारतात किती लोकांना लस द्यावी लागेल?
- काही अभ्यासांनुसार ५५ ते ८० टक्के लोकांमध्ये नैसर्गिकरीत्या किंवा लसीकरणानंतर प्रतिकारशक्ती निर्माण झाली तर त्याला ‘हर्ड इम्युनिटी’ म्हणता येईल. आपल्याकडे सप्टेंबरमध्ये झालेल्या सिरो सर्व्हेमध्ये ६ टक्के म्हणजे सुमारे ८ कोटी लोकांना लागण होऊन गेलेली असावी, असे आढळून आले. डिसेंबरमध्ये ही संख्या तिप्पट झाली तरी सुमारे २४ ते २५ कोटी लोकांना लागण झाली असे म्हणता येईल. हे प्रमाण भारतात ७० टक्क्यांपर्यंत जाणारे नाही. त्यामुळे आपल्याला लस द्यावीच लागणार आहे.
--------------
चौकट १
हर्ड इम्युनिटी विषयी बोलताना गंगाखेडकर म्हणाले, हर्ड इम्युनिटी निर्माण झालेली नाही. तसे असते तर पुण्या-मुंबईसह अन्य शहरांमध्ये लोकांना लागण झाली नसती. नवीन लोकांमध्ये लागण झाल्याची संख्या जवळजवळ नाही इथपर्यत आलेली दिसली असती. अजूनही कुठल्याही राज्यात हजारोंच्या संख्येत लागण होतेय.
---------------