पुणे जिल्ह्यातील थेट जनतेमधून निवडल्या गेलेल्या 'या' आहेत पहिल्या महिला सरपंच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 03:21 PM2017-09-27T15:21:59+5:302017-09-27T15:22:47+5:30
जुलै महिन्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत थेट जनतेमधून सरपंच निवडण्याचा निर्णय झाला होता. नगराध्यक्षानंतर आता ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड थेट जनतेमधून झाली आहे.
पुणे - जनतेमधून थेट सरपंच निवड प्रक्रियेतून जिल्ह्यातील पहिल्या सरपंच होण्याचा मान मुळशीतील बावधन गावच्या पियुषा किरण दगडे यांना मिळाला आहे. पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक किरण दगडे यांच्या त्या पत्नी आहेत. जुलै महिन्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत थेट जनतेमधून सरपंच निवडण्याचा निर्णय झाला होता. नगराध्यक्षानंतर आता ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड थेट जनतेमधून झाली आहे.
सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली. आतापर्यंत ग्राम पंचायतीत निवडून आलेल्या सदस्यांकडे सरपंचाची निवड करण्याचा अधिकार होता. यात ज्या पॅनलकडे बहुमत असायचे त्यांची भूमिका निर्णायक ठरायची. नव्या निर्णयामुळे सरपंच निवडण्याचे सर्वाधिकार जनतेला मिळाले आहेत. त्यामुळे नगराध्यक्षाच्या निवडणुकीप्रमाणे पॅनलच्या बहुमताला महत्व उरणार नाही.
ग्रामीण भागात या निर्णयाबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी, काहींना नव्या निवडपद्धतीबद्दल आक्षेप आहे. सामाजिक दृष्टिकोनातून ही प्रक्रिया अल्पसंख्याकांसाठी अन्यायकारक ठरणार असल्याचे मतही काही जणांनी व्यक्त केले. सरपंचाची निवड थेट जनतेतून करणे योग्य आहे; मात्र त्यापूर्वी ग्रामीण भागातील मानसिकतेत सामाजिक न्यायाची भावना रुजविणे आवश्यक आहे असे काहीजणांचे मत आहे.