पुण्यात होणार बोन्सायची पहिली जागतिक परिषद; १६ देशातील कलाकार होणार सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 06:20 PM2018-02-06T18:20:59+5:302018-02-06T18:24:31+5:30
भारतात बोन्साय कला वाढावी, या कलेचा उपयोग शेतीपूरक व्यवसाय म्हणून व्हावा, या उद्देशाने ‘बोन्साय नमस्ते’ या बोन्सायविषयक पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.
पुणे : भारतात बोन्साय कला वाढावी, या कलेचा उपयोग शेतीपूरक व्यवसाय म्हणून व्हावा, या उद्देशाने ‘बोन्साय नमस्ते’ या बोन्सायविषयक पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानात हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या परिषदेत जगातील १६ विविध देशांतील बोन्साय कलाकार सहभागी होणार असून त्यात प्रामुख्याने बेल्जियम, इटली, इंडोनेशिया, जपान, इंग्लंड, अमेरिका, आॅस्ट्रेलिया, व्हिएतनाम आदी देशांमधील कलाकारांचा समावेश आहे.
प्रदर्शनाची वेळ सकाळी ९ ते रात्री १० असून सदर प्रदर्शनास प्रवेश विनामूल्य असेल. याविषयीची घोषणा प्राजक्ता गिरीधर काळे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी गिरीधर काळे, बोन्साय नमस्तेचे सल्लागार जनार्दन जाधव हे देखील उपस्थित होते.
सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या पटांगणात पिंपळाच्या पानाच्या आकारात साकारण्यात येणा-या या प्रदर्शनात एक हजारांहून अधिक बोन्साय एकाच ठिकाणी पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. ज्यामध्ये १० विभागात मामे, शोहीन, स्मॉल बोन्साय, मिडीयम बोन्साय, लार्ज व एक्स्ट्रा लार्ज बोन्साय अशा इतर अनेक प्रकारांचा समावेश असेल. ज्यामध्ये १ मीटर उंचीचे सर्वांत जुने १५० वर्षांचे उंबराचे बोन्साय आहे, तर ३ इंच उंचीचे बोन्साय हे सर्वांत लहान बोन्साय या ठिकाणी पहायला मिळणार आहे. प्रदर्शनाच्या ठिकाणी बोन्साय विषयक पुस्तकांचे एक ग्रंथालय देखील उभारण्यात येणार आहे.
कृषी व फलोत्पादन महाविद्यालातील विद्यार्थ्यांना या कलेची ओळख व्हावी आणि त्याचा शेतीपूरक व्यवसायासाठी विचार व्हावा यासाठी काही विशेष प्रात्यक्षिके देखील आयोजित करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. भारतात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना बोन्साय कलेचा योग्य वापर केला तर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपण याचा विस्तार करू शकतो. भारतात असलेले वृक्षांचे अनेकविध प्रकार लक्षात घेत बोन्साय कलेच्या वाढीसाठी आपला देश एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरू शकतो. मात्र हे करीत असताना सातत्य आणि संयम हा महत्त्वाचा असल्याचे प्राजक्ता काळे यांनी यावेळी नमूद केले.