शहरातील महाविद्यालयांची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू; जुलै महिना अखेरपर्यंत अर्ज भरता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 11:14 AM2020-07-17T11:14:12+5:302020-07-17T11:21:36+5:30

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे शहरातील सर्व नामांकित महाविद्यालयांनी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे

First year admission process begins; Applications can be submitted till the end of July | शहरातील महाविद्यालयांची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू; जुलै महिना अखेरपर्यंत अर्ज भरता येणार

शहरातील महाविद्यालयांची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू; जुलै महिना अखेरपर्यंत अर्ज भरता येणार

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थी आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.पुणे,नगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी ५० ते ५५ हजार जागाविज्ञान शाखेसाठी तीनही जिल्ह्यांसाठी सुमारे ३० ते ३२ हजार जागा

 पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह सीबीएसई, आयसीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे शहरातील सर्व नामांकित महाविद्यालयांनी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. शुक्रवारपासूनच विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येणार असून जुलै महिना अखेरपर्यंत अर्ज भरण्यास महाविद्यालयांकडून मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असला तरी कोरोनामुळे वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासह इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षेसंदर्भात अद्याप कोणतीही स्पष्ट दिसून येत नाही. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी काही महिने राहणार असल्यामुळे पुणे जिल्ह्याबाहेरून व परराज्यातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच विज्ञान शाखेसह सर्वच शाखांच्या निकालात वाढ झाली आहे.  त्यामुळे प्रथम वर्षाच्या प्रवेशास विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या पुणे ,अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी सुमारे ५० ते ५५ हजार जागा उपलब्ध आहेत. त्यातील सुमारे ३० ते ३५ हजार जागा पुणे जिल्ह्यासाठी ११ ते १२ हजार जागा नाशिक जिल्ह्यासाठी आणि सुमारे ६ हजार जागा अहमदनगर जिल्ह्यासाठी आहेत. त्याचप्रमाणे विज्ञान शाखेसाठी तीनही जिल्ह्यांसाठी सुमारे ३० ते ३२ हजार जागा उपलब्ध आहेत. त्यातील बहुतांश जागा पुणे जिल्ह्यासाठी आहेत. इतर कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांकडून विज्ञान शाखेतील विविध अभ्यासक्रमांसाठी पसंती दिली जाऊ शकते.

स.प.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ म्हणाले, इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे शुक्रवारपासूनच प्रथम वर्षाच्या प्रवेशाबाबतची माहिती महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज भरता येतील.
फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्रसिंह परदेशी म्हणाले, महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विविध अभ्यासक्रमासाठी शुक्रवारपासून प्रवेश अर्ज भरता भरता येतील. विद्यार्थ्यांना २७ ते २८ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाईल. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून प्रवेश दिले जातील.

मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव म्हणाले, गुरुवारी निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रिया संदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. विद्यार्थी ऑनलाइन गुणपत्रिकेच्या आधारे मेरीट फॉर्म भरू शकतील.
-----------------
कोरोनामुळे विद्यार्थी आपल्या घराजवळच महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे पसंत करतील. त्यामुळे ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये यंदा सर्व जागांवर प्रवेश होऊ शकतात. परराज्यातील व इतर जिल्ह्यातील विद्यार्थी पुण्यात येऊन शिक्षण घेणे टाळतील. महाविद्यालयांच्या वसतिगृहामध्ये राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते. पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये वाणिज्य अभ्यासक्रमासाठी सुमारे ५५ हजार जागा आहेत. कॉमर्स सह बीबीसी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

 - डॉ.पराग काळकर, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
------------------
इतर कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे आणि विज्ञान शाखेचा निकाल चांगला लागल्यामुळे अनेक विद्यार्थी पारंपरिक बीएससी अभ्यासक्रमाकडे वळतील. बीएससी ?निमेशन, बीसीएस बीएससी ब्लेंडेड आदि अभ्यासक्रमाचा सुद्धा विद्यार्थी विचार करतील. विद्यापीठाशी संलग्न तीनही जिल्ह्यांमधील महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी सुमारे 32 हजार जागा उपलब्ध आहेत.
- डॉ.एम. जी. चासकर, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
 

Web Title: First year admission process begins; Applications can be submitted till the end of July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.