आधी बांधला पूल, नंतर घेतली परवानगी
By admin | Published: July 28, 2014 04:38 AM2014-07-28T04:38:55+5:302014-07-28T04:38:55+5:30
शहरात नागरिकांना घराची दुरुस्ती करण्यासाठीही महापालिकेची परवानगी घेण्यास बांधकाम विभागाचे उंबरे झिजवावे लागतात
पुणे : शहरात नागरिकांना घराची दुरुस्ती करण्यासाठीही महापालिकेची परवानगी घेण्यास बांधकाम विभागाचे उंबरे झिजवावे लागतात. मात्र, महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बांधकाम व्यावसायिकाने दोन वर्षे आधी बांधलेल्या पुलास एप्रिल २0१४ मध्ये घाईगडबडीने मान्यता देण्याचा प्रकार नुकत्याच झालेल्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत समोर आला आहे. याबाबत शहर सुधारणा समिती सदस्यांनी बांधकाम विभागाकडे बैठकीत विचारणा केली असता, नाला ही जिल्हा प्रशासनाची मालकी असल्याने त्यावर पुलाच्या बांधकामासाठी पालिकेची परवानगी नसल्याचे धक्कादायक उत्तर देण्यात आले. मात्र, परवानगीची आवश्यकता नव्हती तर दोन वर्षांनंतर परवानगी कशी देण्यात आली, याचा खुलासा मात्र प्रशासनास करता आला नसल्याची माहिती नगरसेवक प्रशांत म्हस्के यांनी दिली.
धानोरी येथील स. नं. ४८ मध्ये खासगी बांधकाम व्यावसायिकाच्या जागेकडे जाण्यासाठी नाल्यावर दोन वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आलेला आहे. मात्र, या पुलास महापालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. याबाबत म्हस्के यांनी बांधकाम विभागाकडे तक्रार केल्यानंतर एप्रिल महिन्यात या पुलास घाईगडबडीने मान्यता देण्यात आली आहे. याबाबत म्हस्के यांनी शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करीत या प्रकाराबाबत उपस्थित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली; मात्र कोणत्याही अधिकाऱ्यास उत्तर देता आले नाही. तसेच शहरातील नाल्यांची मालकी जिल्हा प्रशासनाची असल्याने त्यावर पूल बांधण्यासाठी पालिकेच्या परवानगीची गरज नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.
गरज नव्हती तर याबाबत तक्रारी आल्यानंतर परवानगी दिली कशी, याचा काहीच खुलासा अधिकाऱ्यांना करता आला नाही. तसेच याबाबत माहिती नसल्याचे सांगत या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती देण्याचे आश्वासन अतिरिक्त नगर अभियंते विवेक खरवडकर यांनी दिले असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. (प्रतिनिधी)