माळीण पुनर्वसनात भिंतींना तडे
By admin | Published: June 26, 2017 03:43 AM2017-06-26T03:43:31+5:302017-06-26T03:43:31+5:30
माळीण पुनर्वसनात पहिल्याच पावसात ठिकठिकाणी भराव खचल्याने भिंतींना तडे गेल्याने रस्ते खचले, ड्रेनेजलाइन उखडल्या, गटारे छोटी झाल्याने पाणी वाहिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोडेगाव : माळीण पुनर्वसनात पहिल्याच पावसात ठिकठिकाणी भराव खचल्याने भिंतींना तडे गेल्याने रस्ते खचले, ड्रेनेजलाइन उखडल्या, गटारे छोटी झाल्याने पाणी वाहिले. त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, ८-१०
कुटुंबे पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये राहण्यास जाण्याची मागणी करू लागले आहेत.
३० जुलै २०१४ रोजी माळीण गावावर डोंगर कोसळून ४४ कुटुंबांतील १५१ लोक मृत्युमुखी पडले. रात्रभर पडलेल्या पावसामुळे साचलेले पाणी डोंगराला पडलेल्या भेगांमध्ये साचून डोंगराचा कडा कोसळला. यातून नशिबाने बचावलेल्या ग्रामस्थांचे नवीन माळीण वसून कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात आले आहे. यातील ६७ घरांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व इतर मान्यवरांच्या हस्ते झाला.
परंतु पहिल्याच पावसात या गावाची दयनीय अवस्था झाली आहे. दि. २४ रोजी झालेल्या संततधार पावसाने अनेक घरांचे भराव खचले, रस्त्यांना तडे गेले. भिंतींना तडे गेले, घरांच्या पायऱ्या खचल्या, ड्रेनेजच्या पाइपलाइन उखडल्या आहेत. गटारांचे चेंबर खचले आहेत. तसेच अंगणवाडीजवळील मोठी भिंत तुटल्याने शाळेला मोठा धोका निर्माण झाला आहे. शाळेमागील भराव वाहून आल्यामुळे व बाजूच्या भिंतीला तडे गेल्याने तेथे शाळा भरविता येणार नाही. या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
या आरसीसी भिंती घरांवर पडल्या तर गावावर मोठे संकट येऊ शकते. यासाठी काही लोक पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये राहायला जायची मागणी करू लागले आहेत. सुमारे ८-१० कुटुंबांनी तेथून बाहेर पडण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, ही परिस्थिती समजल्यानंतर तहसीलदार रवींद्र सबनीस, नायब तहसीलदार विजय केंगले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.