हा काय मच्छीबाजार आहे का? निवडणूक निरीक्षक संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 09:26 PM2019-05-24T21:26:11+5:302019-05-24T21:26:37+5:30
एकूणच सुशिक्षित म्हटल्या जाणाऱ्या पुणे शहरात निवडणुकीच्या नियमांचे पालन करण्यात अनेक घोळ झाले.
पुणे : मतदान झाल्यानंतर मशीन बंद न करणे, मतमोजणी करणारे कर्मचारी कधीही जागेवरून उठून जाणे, कोणाचाच कोणाशी मेळ नसणे अशा अनेक बाबीने निवडणूक निरीक्षक त्रासले होते. त्यात ६ व्या फेरीत शिवाजीनगर मतदारसंघामध्ये तिसऱ्या वेळी मतदान झाल्यानंतर मशीन बंद न केल्याचा प्रकार समोर आला, तेव्हा निरीक्षकांचा पारा चढला व ते म्हणाले ‘‘हा काय मच्छी बाजार आहे का? कर्मचारी जागेवर दिसत नाही़ त्याांचे व्हिडिओ शूटिंग घ्या. निवडणूक निर्णय अधिकारी व उमेदवार यांना बोलवा, मगच त्यांच्या साक्षीने पुढील निर्णय घ्या’’. निरीक्षकांच्या या पवित्र्याने मग धावपळ सुरू झाली.
एकूणच सुशिक्षित म्हटल्या जाणाऱ्या पुणे शहरात निवडणुकीच्या नियमांचे पालन करण्यात अनेक घोळ झाले. मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानाच्या प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण न केल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम मतमोजणी ला वेळ लागत गेला आहे.
शिवाजीननगरमध्ये मशीन बंद न करण्याचा प्रकार घडला तर, त्याच्या नेमके विरुद्ध चित्र पर्वती मतदारसंघात दिसले़ तेथील किमान तीन मतदान केंद्रातील मशीन बंद करण्याची वेळ ही मतदान संपायच्या वेळेच्या अगोदर असल्याचे दिसून येत होते़
मतदान संपायची वेळ सायंकाळी ६ ची असताना या मशीनवर मशीन बंद करण्याची वेळ सायंकाळी ५़४३, ५़४७, ५़५३ अशी नोंदविण्यात आल्याचे दिसून आले होते़
व्हीव्ही पॅटची मोजली मते
कसबा पेठेत एक मशीन सुरु न झाल्याने शेवटी या मतदान केंद्रातील मतांसाठी व्हीव्ही पॅट मोजण्याचा निर्णय घेतला़ काही ठिकाणी १७ सी फॉर्मवर कंट्रोल युनिटचा नंबर लिहिला नसल्याचे आढळून आले़ एका ठिकाणी मतदान झाल्यानंतर मशीन बंद करण्यात आले नसल्याचे आता मतमोजणीच्या दिवशी लक्षात आले़ मतदान २३ एप्रिलला झाले़ त्यानंतर आता महिना पूर्ण झाला़ महिनाभर मशीन सुरु असले तरी त्याची बॅटरी ९० टक्के चार्ज असल्याचे दाखवत होती़ असे अनेक गमतीजमती पुणे लोकसभा मतदार संघात मतमोजणीच्या दिवशी आढळून आल्या़
.......