प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी पुण्यातून 3 लाख 69 हजार रुपयांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 06:59 PM2018-06-23T18:59:15+5:302018-06-23T19:01:31+5:30
प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी राज्यात शनिवार पासून सुरु झाली. अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पुणे महानगरपालिकेने 3 लाख 69 हजार 100 इतका दंड वसूल केला अाहे.
पुणे : प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी राज्यात शनिवार पासून सुरु झाली. अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पुणे महानगरपालिकेने 3 लाख 69 हजार 100 इतका दंड वसूल केला अाहे. याच प्रकारची कारवाई पुढेही सुरुच ठेवणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहअायुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले.
शनिवारपासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्यात येत अाहे. ही अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिकेवर साेपविण्यात अाली अाहे. शनिवारी सकाळपासूनच पुणे महानगरपालिकेने विविध क्षेत्रिय कार्यालयांच्या माध्यमातून त्या भागात कारवाई करण्यास सुरुवात केली. प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यास पुरेसा वेळ न मिळाल्याचे सांगत काही व्यापाऱ्यांनी या कारवाई विराेधात नाराजी व्यक्त केली. तर नागरिकांनी या प्लास्टिक बंदीचे मनापासून स्वागत केले. शनिवारी नागरिक प्लास्टिकच्या पिशव्यांएेवजी कापडी विशव्या घेऊन घराबाहेर पडल्याचे चित्र हाेते. अनेक व्यापाऱ्यांनीही बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तू अापल्या दुकानांमध्ये ठेवल्या नाहीत. अनेकांनी कापडी पिशव्यांमध्ये सामान ग्राहकांना देण्यावर भर दिला.
पुण्यातील 15 क्षेत्रिय कार्यालयांअतर्गत करण्यात अालेल्या कारवाईत 3 लाख 69 हजार 100 इतका दंड वसूल करण्यात अाला. या कारवाईतून 8 हजार सातशे 11 किलाे इतके प्लास्टिक तर 75 किलाे थर्माकाेल जप्त करण्यात अाले. एकूण 73 जणांवर कारवाई करण्यात अाली. यात दुकानदार, बेकरीचालक अश्या विविध दुकानांवर कारवाई करण्यात अाली. या प्लास्टिक बंदीबाबत बाेलताना किराणा व भूसार मालाचे व्यावसायिक पारस परमार म्हणाले, प्लास्टिक बंदीचा निर्णय हा स्वागतार्ह अाहे. परंतु ही प्लास्टिक बंदी केल्यावर प्लास्टिक वस्तूंना पर्याय काय, याबाबत नागरिकांमध्ये साशंकता अाहे. या बंदीमुळे छाेटा व्यापारी ताेट्यात जाणार अाहे. ब्रॅण्डेड वस्तूसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या अावरणाला बंदी घालण्यात अाली नाही, मात्र छाेट्या व्यापाऱ्यांकडून वस्तू पॅक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अावरणाला बंदी घालण्यात येत अाहे. ब्रॅण्डच्या नावाखाली छाेट्या व्यापाऱ्यांना संपविण्याचे काम सरकार करीत अाहे.
दरम्यान यापुढेही प्लास्टिक बंदीची कारवाई अशीच चालू ठेवणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.