रागाच्या भरात कामगाराने व्यवस्थापकावर केले कोयत्याने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:20 AM2021-09-02T04:20:17+5:302021-09-02T04:20:17+5:30
पुणे : जुन्या जिममधील साहित्य नवीन जागेत शिफ्ट करीत असताना जबाबदारीने काम करा नाहीतर काम सोडा असे सुनावल्याचा राग ...
पुणे : जुन्या जिममधील साहित्य नवीन जागेत शिफ्ट करीत असताना जबाबदारीने काम करा नाहीतर काम सोडा असे सुनावल्याचा राग आल्याने कामगाराने व्यवस्थापकावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात व्यवस्थापक जखमी झाल्याने पौड पोलिसांनी कामगाराला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीस ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
श्रीकांत हनुमंत वाळुंज (रा. कुंभेरी, ता. मुळशी) असे कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. श्याम पायप्पा पटेल (वय ४६, वरिष्ठ व्यवस्थापक, सुविधाप्रमुख) हे जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲॅम्बी व्हॅली सहारासिटी परिसरात जुन्या जिमसमोर २८ ऑगस्ट रोजी दुपारी हा प्रकार घडला. फिर्यादी हे ॲम्बी व्हॅली सहारासिटी येथे फॅसिलिटी हेड (सुविधाप्रमुख ) म्हणून नोकरी करतात.
स्पोर्टस सेंटरमधील जुन्या जिममधील सामान नवीन जिममध्ये हलविण्याचे काम सुरू आहे. श्रीकांत वाळुंज याने २५ ऑगस्ट रोजी फिर्यादींना मोबाईलवर कॉल करून साहित्य शिफ्ट करताना फुटले तर भरपाई द्यावे लागेल असे सांगितले. त्यावर तुम्ही जबाबदारीने काम करा नाहीतर काम सोडा असे फिर्यादी यांनी सुनावले. त्याचा राग मनात धरून तीन दिवसांनी साहित्य हलविण्याचे काम सुरू असताना श्रीकांतने पटेल यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. तसेच मला कामावरून काढून टाकणार होता, आता मी तुला मारतो असे बोलून आणखीे एक वार केला तो फिर्यादीच्या हातावर लागला. दरम्यान तेथे असलेल्या इतरांनी श्रीकांत याला पकडले. मात्र, त्यानंतर तो दुचाकीवरून पळून गेला. जखमी झालेले फिर्यादी पटेल यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले. उपाचार घेतल्यानंतर त्यांनी पौड पोलिसांत तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलिसांनी तपास करीत मंगळवारी दि. ३१ ऑगस्ट रोजी रात्री आरोपीस अटक केली.
विशेष सहायक सरकरी वकील नीलेश लडकत यांनी आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे न्यायालयास सांगितले तसेच आरोपीने गुन्ह्यांत वापरलेला कोयता जप्त करणे, कोयता सोसायटीमध्ये कसा घेऊन आला, त्याला या गुन्ह्यात कोणी मदत केली आहे का याचा तपास करण्यासाठी त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करीत 3 दिवसांची कोठडी सुनावली.