रवींद्र बऱ्हाटेच्या ५ साथीदारांच्या नंदूरबारहून अटक; गेल्या पाच महिन्यांपासून पोलिसांना देत होते गुंगारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 08:12 PM2021-01-13T20:12:17+5:302021-01-13T20:13:26+5:30
विशेष सत्र न्यायालयाने सर्व आरोपींचे पकड काढले होते वॉरंट.
पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे व इतर १३ आरोपींविरुद्ध गेल्या वर्षी धमकावून जबरदस्तीने जागा बळकाविणे, खंडणी मागणे अशा विविध कलमाखाली हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात १३ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. मोक्का अंतर्गत कारवाई केल्यानंतर अनेक आरोपी फरार झाले होते. गेली ५ महिने हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. विशेष सत्र न्यायालयाने सर्व आरोपींचे पकड वॉरंटही काढले होते. मात्र बऱ्हाटे याच्या ५ साथीदारांना नंदूरबार येथे जाऊन सापळा रचून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
विशाल शिवाजी ढोरे (वय ३६), अस्लम मंजूर पठाण (वय २४), सचिन गुलाब धिवार (वय ३२), परवेज शब्बीर जमादार (वय ३९, रा. बालाजी विश्वनाथ लाखाडे (वय २७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या कारवाईची माहिती दिली. यावेळी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्च्नसिंह उपस्थित होते. पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये गुन्हे शाखेचे स्वतंत्र तपास पथक तयार केले होते. त्यापैकी युनिट ५ कडील अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक गोपनीय माहितीचा आधार घेऊन शोध घेत होते. विशाल ढोरे हा इतर चार आरोपींना सोबत घेऊन महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, धुळे व इतर ठिकाणी लपून गुंगारा देत होता. युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे व सहकार्यांना हे आरोपी नंदुरबार येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथक तातडीने नंदुरबारला पोहचले व ते लपले होते, त्याठिकाणी छापा घालून ५ जणांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह वेगवेगळ्या कंपनीचे सीम कार्ड, २ चारचाकी मोटार जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यात १३ पैकी ११ आरोपींना पकडण्यात यश आले आहे. मुख्य सुत्रधार रवींद्र बर्हाटे हा अद्याप फरार आहे. न्यायालयाकडून त्याला फरारी घोषित करण्यात आले आहे.
ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, प्रसाद लोणारे, उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, प्रमोद टिळेकर, महेश वाघमारे, विशाल भिलारे, विनायक जाधव, प्रविण काळभोर, अंकुश जोगदंड, विलास खंदारे, संजय दळवी, स्नेहल जाधव या पथकाने केली आहे.