दाभोलकर हत्याप्रकरणी पाच आरोपींवर मंगळवारी आरोप निश्चिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:14 AM2021-09-05T04:14:24+5:302021-09-05T04:14:24+5:30
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील पाच आरोपींवर येत्या मंगळवारी (दि. ७) आरोप ...
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील पाच आरोपींवर येत्या मंगळवारी (दि. ७) आरोप निश्चित करण्यात येणार आहेत. त्यासाठी आरोपींना प्रत्यक्ष किंवा ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे उपस्थित राहण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला. याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्याविरोधात आरोपींवर कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आले आहेत तर, आरोपी ॲॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर पुरावे नष्ट करण्याचा आरोप आहे. यापैकी तावडे, अंदुरे आणि कळसकर कारागृहात असून, पुनाळेकर आणि भावे जामिनावर आहेत.
विशेष न्यायालयात शुक्रवारी आरोपींवर आरोप निश्चित करण्यासाठी युक्तिवाद करण्यात आला. ‘सीबीआय’चे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी खटल्याची पार्श्वभूमी सांगून आरोपींवरील आरोप निश्चित करण्याची मागणी केली. बचाव पक्षातर्फे ॲॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी ‘सीबीआय’च्या दोषारोपपत्रात विसंगती असल्याचा युक्तिवाद केला. ॲॅड. संजीव पुनाळेकर यांनीही आपली बाजू मांडली. त्यानंतर आरोपींवर कोणत्या कलमांखाली आरोपनिश्चिती करायची आहे, याबाबत येत्या मंगळवारी सुनावणी होणार असून, त्यासाठी सर्व आरोपींना उपस्थित राहण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले.
चौकट
दि. २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ओंकारेश्वर पुलावर गोळी झाडून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात सीबीआयने संशयित आरोपी सचिन अंदुरे, शरद कळसकर, हिंदू जनजागृती समितीचे सदस्त डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक करून त्यांची चौकशी केली होती. ज्यातून दाभोलकर यांची हत्या करण्यात आलेले पिस्तूल नष्ट करण्यातही भावे व पुनोळकर यांनीच मदत केली असल्याचे समोर आल्यानंतर मे २०१९ मध्ये दोघांना अटक करण्यात आली. दरम्यान, सत्र न्यायालयाने पुनाळेकर आणि भावे यांना जामीन मंजूर केला.