Pune: वडगाव रासाईत शॉर्टसर्किटमुळे पाच एकर ऊस जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 01:58 PM2023-11-08T13:58:15+5:302023-11-08T13:58:59+5:30
वडगाव रासाई (ता. शिरुर) येथे सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे...
रांजणगाव सांडस (पुणे) : वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे वीज तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन शेतकऱ्याचा तोडणीला आलेला पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे. वडगाव रासाई (ता. शिरुर) येथे सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
येथील शेतकरी अमोल मारुती शेलार यांची वडगाव रासाई- मांडवगण फराटा रस्त्यालगत शेती आहे. या शेतातून महावितरण कंपनीची मेन लाईन गेलेली आहे. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास येथे शॉर्टसर्किटमुळे तोडणी योग्य उसाला आग लागली होती. या आगीत पाच एकर ऊस व ठिबक सिंचन संच जळून खाक झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दुपारच्या वेळी आग लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. शेतकरी शेलार यांच्या डोळ्या समोर ऊस जळत होता. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या शेतात असलेली मेन लाईन रस्त्याच्या कडेने घेण्या बाबत शेलार यांनी महावितरण कंपनीकडे विनंती केली होती. परंतु सदर कंपनीने ही मागणी गांभीर्याने घेतली नाही. तरी सदर कंपनीने विजेची मेन लाईन रस्त्याच्या कडेने घेऊन शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी ग्रामस्थ मागणी करीत आहेत.